आता वीकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद; कामगार अडचणीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:15 IST2021-06-28T04:15:14+5:302021-06-28T04:15:14+5:30
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध ...

आता वीकेंड घरातच; हॉटेलिंग राहणार बंद; कामगार अडचणीत !
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना अनलॉक करण्यात आले होते. व्यवहार पूर्वपदावर येत असतानाच राज्य शासनाने नवे निर्बंध पुन्हा लागू केले आहेत. त्यानुसार गर्दी रोखण्यासाठी रविवारी सायंकाळी ४ वाजल्यानंतर सर्वच व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेल सुरू राहणार असून, शनिवार आणि रविवार या वीकेंडच्या कालावधीत हॉटेलमधून केवळ पार्सल सुविधा सुरू राहणार आहे. लातूर शहरात जवळपास दीडशेहून अधिक हॉटेल, रेस्टॉरंट आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या अडीच हजार आहे. मात्र, नवीन नियमामुळे हॉटेल व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
शहरातील एकूण हॉटेल्स १५०
हॉटेल्सवर अवलंबून असलेले कर्मचारी २,५००
हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार
दीड वर्षापासून कोरोनाच्या साथीमुळे हॉटेल व्यवसाय कोलमडला आहे. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, नव्या निर्बंधांमुळे हॉटेल व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे. शासनाने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. - प्रवीण कस्तुरे, हॉटेल व्यावसायिक
अनलॉक झाल्यानंतर हॉटेल व्यवसाय परिस्थितीत बदल होत होते. मात्र, अचानक दुपारी ४ वाजेपर्यंतच हॉटेल सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. शनिवार, रविवार केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. या नियमांमुळे हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान होणार आहे. - प्रसाद उदगीरकर, हॉटेल व्यावसायिक.
सोमवार ते शुक्रवार ५० टक्के क्षमता राहणार
हॉटेल व्यवसाय हा अत्यंत महत्त्वाचा आणि गरजेचा म्हणून ओळखला जातो. यावर अनेकांचा रोजगार अवलंबून आहे. अनेकजण कुटुंबासमवेत जेवणासाठी हॉटेलला पसंती देतात.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने कधी चालू तर कधी बंद अशा संकटामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे व्यावसायिकांचे नियोजन कोलमडले आहे.
सकाळी ७ ते ४ यावेळेत हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची संख्याही मोजकीच असते. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल
गेल्या दीड वर्षापासून हॉटेल कधी चालू तर कधी बंद आहेत. त्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात येते. त्यामुळे हाताला काम मिळत नाही. आता परिस्थिती पूर्वपदावर येत होती. मात्र, आता त्यात नवीन नियमामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. - शरद मगर
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला की, लॉकडाऊन जाहीर केले जाते. मात्र, सर्वसामान्यांना या निर्णयामुळे त्रास सहन करावा लागतो. हॉटेलसाठी निर्बंध लागू करण्यात आल्याने कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे आर्थिक उत्पन्न बंद होईल. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, हा प्रश्न आहे. - नेताजी मोतीबोणे