ज्वारीची राखण करण्यासाठी आता ध्वनिक्षेपकांचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:16+5:302021-03-07T04:18:16+5:30
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून, मशागतीपासून ते पेरणीपर्यंत आणि फवारणीपासून ते राशीपर्यंत यांत्रिक शेती केली ...

ज्वारीची राखण करण्यासाठी आता ध्वनिक्षेपकांचा वापर
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असून, मशागतीपासून ते पेरणीपर्यंत आणि फवारणीपासून ते राशीपर्यंत यांत्रिक शेती केली जात आहे. यंदा यामध्ये आणखी भर पडली असून, रबी ज्वारीची चिमण्या आणि पाखरे तसेच रानडुक्करे यांच्यापासून राखण करण्यासाठी चक्क लाऊडस्पीकरचा वापर केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे शारीरिक श्रम तर कमी झाले आहेत. शिवाय, एका ठिकाणी लाऊडस्पीकर लावून ठेवले की, दिवसभर रेडीमेड आवाज शिवार दणाणून साेडत आहे. परिणामी, माणसाविना ज्वारीची चिमण्या, पाखरांपासून राखण होत आहे. म्हणून प्रत्येक शेतकरी लाऊडस्पीकरला पसंती देत आहेत. म्हणून शेतशिवारात ज्वारीची राखण करण्यासाठी सर्वत्र अशा लाऊडस्पीकरचा वापर होत आहे.
२ हजार ३६२ हेक्टर्सवर ज्वारी...
शिरुर अनंतपाळ तालुक्यात यंदा रबीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, २ हजार ३६२ हेक्टर्सवर ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. त्यामुळे नियोजित क्षेत्राच्या ११५ टक्क्यांवर ज्वारीचा पेरा झाला आहे. आता ज्वारी ऐन हुरड्यात आली आहे. त्यामुळे ज्वारीची चिमण्या, पाखरांपासून राखण करण्यासाठी दोन दोन माणसे लावावी लागत आहेत. लाऊडस्पीकरचा वापर केला तर एका माणसाची सुध्दा गरज नाही. परिणामी, चार पाचशे रुपयांत मिळणाऱ्या लाऊडस्पीकरचा सर्व शेतकरी वापर करीत आहेत.
दिवसा आणि रात्रीही स्पीकर्सचा वापर...
ज्वारीची दिवसा चिमण्या आणि पाखरापासून राखण करण्यासाठी हाहाकाराचा रेडीमेड आवाज लावला जातो. तर रात्रीच्या वेळी रानडुक्करे येऊन ज्वारीची नासधूस करू नये म्हणून वेगळ्या पद्धतीचा आवाज लावला जातो. त्यामुळे आवाजाला घाबरून रानडुक्करे येत नाहीत, असे रमेश पाटील, राजकुमार नमनगे, तुकाराम पाटील, धनंजय स्वामी ,मेजर दिलीप बिरादार यानी सांगितले. त्यामुळे दिवसा आणि रात्रीही स्पीकर्सचा असा दुहेरी वापर केला जात आहे.
तासभर चार्जिंग अन् दिवसभर वापर...
लााऊडस्पीकरची किंमतसुध्दा माफक असून, या स्पीकरला केवळ तासभर विजेवर चार्जिंग करायचे आणि दिवसभर त्याचा वापर करायचे आहे. एवढेच नव्हे, तर या स्पीकरला विविध आवाज निघण्यासाठी सहा बटण दिले आहेत. त्यामुळे हवा तो आवाजसुध्दा काढला जातो. त्यामुळे ज्वारीची राखण करण्यासाठी लाऊडस्पीकरचा अत्यंत प्रभावी उपयोग होत असल्याचे मेजर दिलीप बिरादार यांनी सांगितले.