दोन दिवसात एकही बाधित नाही, कोविड हॉस्पिटल झाले रिकामे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:28+5:302021-06-05T04:15:28+5:30
अहमदपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्चपासून शहर व तालुक्यात संसर्ग वाढला होता. एप्रिलमध्ये तर उच्चांकी रुग्णसंख्या आढळून आली. ...

दोन दिवसात एकही बाधित नाही, कोविड हॉस्पिटल झाले रिकामे !
अहमदपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्चपासून शहर व तालुक्यात संसर्ग वाढला होता. एप्रिलमध्ये तर उच्चांकी रुग्णसंख्या आढळून आली. दरम्यान, प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जूनच्या पहिल्या आठवड्यात कोरोना नियंत्रणात आला आहे. गेल्या ८ पैकी ५ दिवसांत एकही बाधित आढळून आला नाही. त्यामुळे दिलासा मिळाला आहे.
शहर व तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट मार्चमध्ये सुरू झाली. मार्चमध्ये ६२० बाधित आढळले. एप्रिलमध्ये उच्चांकी रुग्ण आढळले. ३ हजार ९९३ बाधितांची नोंद होती. दरम्यान, प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी केल्याने मे महिन्यात ४८० रुग्ण आढळले. जूनच्या पहिल्या आठवड्यातील तीन दिवसांत ३०८ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात केवळ ३ पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गत दोन दिवसांत एकही बाधित आढळला नाही. सध्या तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्ण ४२ आहेत. त्यापैकी गृहविलगीकरणात २६, मरशिवणीच्या कोविड केअर सेंटरमध्ये १२ आणि विविध खासगी रुग्णालयात ४ जण उपचार घेत आहेत. ग्रामीण रुग्णालयातील कोविड हॉस्पिटल रिकामे झाले आहे. दरम्यान, ग्रामीण भागातील बाधितांची संख्याही कमी झाली आहे. त्यामुळे कोविड केअर सेंटरची १५० खाटांची क्षमता आता ५० खाटा करण्यात आली आहे.
८ दिवसांचा शहरातील अहवाल...
२८ मे रोजी ४५ चाचण्या करण्यात आल्या असता त्यात २ पॉझिटिव्ह आढळले. २९ रोजीच्या १२ चाचण्यांत एकही बाधित आढळला नाही. ३० रोजीच्या १८३ चाचण्यांतही एकही रुग्ण आढळला नाही. ३१ मे रोजी १०९ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३ पॉझिटिव्ह आढळले. १ जून रोजीच्या ९७ चाचण्यांत ३ पॉझिटिव्ह निष्पन्न झाले. २ जून रोजीच्या ११० आणि ३ रोजीच्या १०१ चाचण्यांत एकही बाधित आढळला नाही.
लसीकरण करून घ्यावे...
४५ वर्षांवरील नागरिकांना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यावे. लसीकरण हेच जीवरक्षक आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार म्हणाले.
गृहविलगीकरण बंद...
शहर व तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. बाधितांनी गृहविलगीकरणात न राहता संस्थात्मक विलगीकरणात रहावे, असे आवाहन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांनी केले.
ग्रामीण भागातही बाधित कमी...
ग्रामीण भागातही कोरोना बाधित कमी होत आहेत. नागरिक लसीकरण करून घेत आहेत. तसेच शासकीय नियमांचे पालन केले जात असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील दासरे यांनी सांगितले.