नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत, पशुधनाच्या कृत्रिम रेतनावर संक्रांत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:19 AM2021-05-12T04:19:45+5:302021-05-12T04:19:45+5:30

चापोली : सध्या पशुचिकित्सालयात नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कृत्रिम रेतन अडचणीत आले आहे. परिणामी, रेतनासाठी सिमेन (रेतमात्रा) ही वेळेत ...

Nitrogen supply disrupted, artificial insemination of livestock! | नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत, पशुधनाच्या कृत्रिम रेतनावर संक्रांत!

नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत, पशुधनाच्या कृत्रिम रेतनावर संक्रांत!

Next

चापोली : सध्या पशुचिकित्सालयात नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत झाल्याने कृत्रिम रेतन अडचणीत आले आहे. परिणामी, रेतनासाठी सिमेन (रेतमात्रा) ही वेळेत मिळत नसल्याने पशुपालकांचा ताण वाढला आहे. सध्या ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे नायट्रोजन वाहतूक करणारे टँकर हे शासन पातळीवरून ऑक्सिजन वाहतुकीसाठी वापरण्यात येत असल्याने नायट्रोजनचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

कोरोनाचा संसर्ग वाढल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यामुळे उपचारासाठी प्रत्येक रुग्णालयात गर्दी होत आहे. दरम्यान, काही बाधित रुग्णांच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत असल्याने ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत ऑक्सिजन आणण्यासाठी टँकर कमी पडत असल्याने प्रशासनाने नायट्रोजन पुरवठा करणारे सर्व टँकर ऑक्सिजन वाहतुकीसाठी घेतले आहेत. त्याचा परिणाम नायट्रोजन पुरवठ्यावर झाला आहे. दर महिन्याला ७ हजार २०० लिटर नायट्रोजन जिल्ह्यासाठी लागते. पुण्यातील खासगी कंपनी जिल्ह्यास नायट्रोजनचा पुरवठा करते. कृत्रिम रेतनासाठीचे सिमेन वापराआधी लिक्विड नायट्रोजनमध्ये बुडवून ठेवावे लागते. डबल कोटेड क्रायोजनिक टँकरमधून पुण्याहून नायट्रोजनचा पुरवठा होतो.

जिल्ह्यात दुग्धोत्पादन बऱ्यापैकी असल्यामुळे महिन्याला एक टँकर लागते; पण सध्या टँकर नसल्याने ३५ ते ४० दिवसातून एक टँकर येत आहे. त्यामुळे दर १५ ते २० दिवसाला नायट्रोजन पोहोच होणारी यंत्रणाच विस्कळीत झाली असल्याने रेतनाची प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. त्याचा पशुपालकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मासिक ७०० कृत्रिम रेतन...

गाय, म्हशीवर वेळेत रेतन करावे लागते. अन्यथा भाकड काळ वाढून पुढील दूध उत्पादनास फटका बसू शकतो. चाकूर तालुक्यात एकूण श्रेणी १ चे ४, तर श्रेणी २ चे ११, असे एकूण १५ शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. तिथे दर महिन्याला साधारणपणे ७०० ते ८०० कृत्रिम रेतन होते. कृत्रिम रेतनासाठी एका सिमेनची किंमत शासकीय दवाखान्यात ४० रुपये, तर खाजगीमध्ये १०० रुपये एवढी आहे.

लवकरच परिस्थिती सुरळीत होईल...

कोविडमुळे नायट्रोजनचा पुरवठा करणारे टँकर हे

ऑक्सिजन वाहतुकीसाठी वापरले जात आहे. सध्या नायट्रोजनच्या पुरवठ्यात विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे कृत्रिम रेतनासाठी अडचणी येत आहेत. जास्त मागणी असणाऱ्या पशुवैद्यकीय चिकित्सा केंद्रावर नायट्रोजन पुरवठा करण्यास प्राधान्य दिले आहे. लवकर ही परिस्थिती सुरळीत होईल.

- डॉ. एस. एस. कोकणे, प्रभारी तालुका पशुधन विकास अधिकारी.

Web Title: Nitrogen supply disrupted, artificial insemination of livestock!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.