निलंग्यात रस्त्यावरील खड्ड्यांतील माती न काढताच डागडुजीचे काम सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:01+5:302020-12-15T04:36:01+5:30
निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे ...

निलंग्यात रस्त्यावरील खड्ड्यांतील माती न काढताच डागडुजीचे काम सुरु
निलंगा : शहरातून जाणाऱ्या लातूर- बीदर रस्त्यावर खड्डे पडले आहेत. सध्या शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंतच्या रस्त्याच्या डागडुजीचे काम सुरु आहे. परंतु, खड्ड्यातील मातीही न काढता ही डागडुजी केली आहे. विशेष म्हणजे, शनिवार व रविवार हे दोन सुटीचे दिवस असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे.
लातूर- बीदर मार्ग शहरातून जातो. गेल्या काही वर्षांपासून या मार्गावर खड्डे पडले आहेत. हा रस्ता आंध्रप्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या तीन राज्यांना जोडणारा आहे. त्यामुळे या मार्गावर सतत अवजड वाहनांची वाहतूक असते. खड्ड्यांमुळे या रस्त्यावरुन अवजड वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अनेकदा अपघात घडले आहेत. तसेच उसाचे भरलेले ट्रकही उलटले आहेत. त्यामुळे चार- पाच वर्षांपासून या रस्त्यावरील खड्डे बुजवावेत, अशी वारंवार मागणी होत आहे.
दरम्यान, दोन वर्षांपूर्वी संबंधित रस्त्याच्या डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले. मात्र, संबंधित गुत्तेदाराने थातूरमातूर काम करुन ते थांबविले आहे. चार दिवसांपूर्वी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पांचाळ कॉलनीपर्यंत केवळ ६०० ते ८०० मीटर रस्त्याचे काम करून थांबविले.
शहरातील पांचाळ कॉलनी ते उदगीर मोडपर्यंत खड्डे बुजविण्याचे काम अन्य गुत्तेदारास मिळाले आहे. शनिवार व रविवारी या सुट्टीच्या दिवशी या कामाला सुरुवात करण्यात आली. हे काम दुतर्फा पूर्णही केले. मात्र, रस्त्यातील अनेक खड्डे अद्यापही जैसे थे आहेत. मोठे खड्डे बुजविताना त्यातील मातीही काढली नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
कामाची गुणवत्ता तपासावी...
सदरील काम हे योग्य पध्दतीने झाले नाही. त्यामुळे त्याची गुणवत्ता तपासून बिल अदा करण्यात यावे. चांगले काम न झाल्यास बिल रोखून पुन्हा काम करुन घेण्यात यावे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. दरम्यान, यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पटेल यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.
यापूर्वीच्या कामाची चौकशी करा...
दोन वर्षांपूर्वी निलंगा ते खरोसा रोडवरील डागडुजीसाठी २ कोटी ५० लाख मंजूर झाले होते. सदरील काम पूर्ण झाले की नाही, त्याचीही चौकशी करण्यात यावी. तसेच गुणवत्ता तपासावी, अशी मागणी शिवसेनेचे ईश्वर पाटील यांनी केली.
***