निलंगा/ किल्लारी (जि. लातूर) : दुचाकीवरून गावाकडे निघालेल्या तिघांच्या मोटारसायकलचा आणि कारचा भीषण अपघात औसा-लामजना मार्गावरील दावतपूर पाटीजवळ रविवारी रात्री ११:१५ वाजेच्या सुमारास झाला. त्यात दोघा चुलतभावांसह एका मित्राचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सरवडी (ता. निलंगा) गावावर शोककळा पसरली आहे.
सोमनाथ दयानंद हिप्परगे (२२), अभिजित शाहुराज इंगळे (२३), दिगंबर दत्ता इंगळे (२७, सर्वजण रा. सरवडी, ता. निलंगा) अशी मृत तिघांची नावे आहेत. पोलिसांनी सांगितले, निलंगा तालुक्यातील सरवडी येथील अभिजित इंगळे, दिगंबर इंगळे हे दोघे चुलतभाऊ आणि त्यांचा मित्र सोमनाथ हिप्परगे हे रविवारी रात्री दुचाकीवरून औसा-लामजना मार्गाने गावाकडे निघाले होते. ते दावतपूर पाटी ते वाघोली पाटीदरम्यान पोहोचले असता, भरधाव वेगातील कारने (एमएच- १४, एफजी- ७१७२) समोरून जोराची धडक दिली. या अपघातात सोमनाथ हिप्परगे याचा जागीच मृत्यू झाला, तर अभिजित इंगळे व दिगंबर इंगळे हे गंभीर जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक किसन मरडे, गणेश यादव, मुरली दंतराव, राजपाल साळुंके, शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी दोघा चुलतभावांना उपचारासाठी औसा येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत झाल्याचे घोषित केले. या घटनेची पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
जिवलग मित्रांच्या मृत्यूमुळे सरवडी गावावर शोककळासरवडीतील अभिजित, दिगंबर व सोमनाथ तिघे जिवलग मित्र होते. या मित्रांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच गावावर शोककळा पसरली. या तिघांचे पार्थिव गावात आणले असता संपूर्ण गाव हळहळत होते. शोकाकुल वातावरणात तिघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
एकुलता एक मुलगा हिरावल्याने कुटुंबावर दु:खाचा आघातअभिजित याच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो कुटुंबात एकुलता एक मुलगा आणि अविवाहित होता. त्यामुळे आई व बहिणींनी हंबरडा फोडला होता. मृत सोमनाथ हा पदवीधर असून, तोही अविवाहित होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, असा परिवार आहे. तर मृत दिगंबर हा विवाहित असून, त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, एक भाऊ, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
कुटुंबीय, नातेवाइकांचा आक्रोशमृत तिघा मित्रांचे मृतदेह गावात आल्यानंतर कुटुंबीयांनी व नातेवाइकांनी आक्रोश सुरू केला. मृत अभिजित व दिगंबर यांच्यावर जवळजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले, तर साेमनाथ याच्यावर शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेमुळे अख्खे गाव दु:खात बुडाले आहे.