उन्हाळी सोयाबीन एक नवा पर्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:46+5:302021-06-25T04:15:46+5:30

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन बियाणे भिजून उगवण क्षमता कमी झाली. अशा परिस्थितीत चालू खरीप हंगामात ...

A new alternative to summer beans | उन्हाळी सोयाबीन एक नवा पर्याय

उन्हाळी सोयाबीन एक नवा पर्याय

गेल्यावर्षीच्या खरीप हंगामात काढणीच्या वेळेस अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन बियाणे भिजून उगवण क्षमता कमी झाली. अशा परिस्थितीत चालू खरीप हंगामात सोयाबीनची मोठी गरज भासणार हे लक्षात घेऊन उन्हाळी सोयाबीन लागवडीचा यशस्वी प्रयोग निलंगा तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी केला आहे.

तालुका कृषी अधिकारी राजेंद्र काळे, मंडल कृषी अधिकारी रणजित राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निलंगा तालुक्यातील ७३ शेतकऱ्यांनी एकशे पाच एकर क्षेत्रावर सोयाबीन लागवड करून अंदाजे ५५० क्विंटल दर्जेदार सोयाबीन बियाण्याचे उत्पादन घेतले आहे. नणंद येथील अभ्यासू व प्रगतशील शेतकरी प्रदीप मुकुंदराव नणंदकर यांनी कृषी सहाय्यक सुनील घारुळे यांच्या मार्गदर्शनाखाली उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचा प्रयोग यावर्षी प्रथमच आपल्या शेतात केला. खरिपात दरवर्षी सदोष बियाण्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्येवर मात करण्यासाठी त्यांचा प्रयोग शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरला आहे. एकरी सव्वातेरा क्विंटलपर्यंत उन्हाळी सोयाबीनचे उत्पादन घेत त्यांनी खरिपासाठी दर्जेदार बियाणे तयार केले आहे. सोयाबीनसाठी उन्हाळी हंगामाच्या तुलनेत खरीप हंगाम अनुकूल मानला जातो, हा समज त्यांनी खोटा ठरवला आहे.

उन्हाळ्यात त्यांनी ‘फुले संगम’ या वाणाची १ फेब्रुवारी रोजी दोन एकर क्षेत्रात दोन ओळीतील अंतर १८ इंच ठेवून पेरणी केली. त्यासाठी त्यांना एकरी २५ किलो बियाणे लागले. बेसल डोसमध्ये डीएपी एकरी एक बॅग व एकरी दहा किलो गंधक दिले. तुषार सिंचनाद्वारे पाणी देऊन पेरणी केली. त्यानंतर फेब्रुवारी, मार्च महिन्यात दहा ते बारा दिवसांनी तर एप्रिल-मे महिन्यात दर आठवड्याला एक याप्रमाणे पाणी दिले. रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी शिफारशीत कीटकनाशकाची एक फवारणी केली. या प्रयोगात त्यांना एकरी सव्वातेरा क्विंटलपर्यंत बीजोत्पादन मिळाले.

सर्व बियाण्याचे झाले बुकिंग

नणंदकर म्हणाले की, खरीप २०२१साठी माझ्याकडील सर्व बियाण्याचे बुकिंग झाले आहे. प्रतिक्विंटल नऊ हजार रुपये दर मिळाला आहे. उन्हाळी हंगामात कीडरोगाचे प्रमाण तुलनेने कमी असते. फवारणीचा खर्च खरिपाच्या तुलनेत कमी येतो. खरीप पेरणीसाठी एकरी बियाण्याचे प्रमाण वीस किलोपर्यंत ठेवता येते. कारण उन्हाळी सोयाबीन दाण्याचा आकार लहान असून, उगवणक्षमता ९० टक्केपर्यंत असते. एप्रिलमध्ये काढणीसाठी मजुरांची उपलब्धता असते. खरीप हंगामापेक्षा तुलनेने खर्च कमी येतो. सदोष बियाण्यामुळे निर्माण होणाऱ्या नुकसानाची जोखीम कमी करता येते.

Web Title: A new alternative to summer beans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.