चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू
By संदीप शिंदे | Updated: June 29, 2023 19:37 IST2023-06-29T19:36:42+5:302023-06-29T19:37:11+5:30
उदगीर तालुक्यातील डिग्रस येथील घटना

चुलतीच्या अंत्यविधीवरून परतताना पुतण्याचा अपघातात मृत्यू
उदगीर : चुलतीच्या अंत्यविधीसाठी गावाकडे गेलेल्या पुतण्याचा परत येत असताना उदगीर तालुक्यातील डिग्रस येथे अपघात होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत चारचाकी वाहनचालकाविरुद्ध मंगळवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, नळेगाव येथे काम करणारे तुकाराम माणिक पिल्लेवाड (वय ४५ रा. भगनुरवाडी ता. मुखेड) हे दुचाकी क्रमांक २४ डब्ल्यू ८८३५ वरून चुलतीच्या अंत्यविधीसाठी २० जून रोजी गावाकडे गेले होते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ते पत्नीसह दुचाकीवरून नळेगावकडे येत असताना २२ जून रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या सुमारास डिग्रस येथे समोरून भरधाव वेगात आलेल्या कार क्रमांक एम.एच. २४ बी.आर. ३१६१ ने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात तुकाराम पिल्लेवाड गंभीर जखमी झाले.
दवाखान्यात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी मुक्ताबाई पिल्लेवाड या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांनी उपचारानंतर मंगळवारी रात्री उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.