आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ
By हरी मोकाशे | Updated: September 26, 2022 17:50 IST2022-09-26T17:50:57+5:302022-09-26T17:50:57+5:30
२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे.

आई राजा उदे उदेच्या जयघोषाने नवरात्रोत्सवास उत्साहात प्रारंभ
रेणापूर (जि. लातूर) : आई राजा उदे उदे, रेणुका माता की जय अशा जयघोषात ग्रामदैवत श्री रेणुका देवी मंदिरात सोमवारी दुपारी १ वा. विधीवत पूजा, महाआरती करुन मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. दोन वर्षानंतर यंदा भाविकांना घटस्थापनेवेळी उपस्थित राहता आल्याने भाविकांत आनंद, उत्साह दिसून येत होता.
२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत येथील श्री रेणुका देवी मंदिरात नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. ५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी दिवशी महोत्सवाची सांगता होणार आहे. नवरात्रोत्सवानिमित्ताने नऊ दिवस विविध पारंपारिक धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. नवरात्रोत्सवात भाविकांना श्री रेणुका माता देवीचे २४ तास दर्शन घेता येणार आहे. दसऱ्या दिवशी शोभेच्या दारुकामाची आतषबाजी करण्यात येणार असून शहरातून देवीची पालखी मिरवणूक निघणार आहे.
गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत कोविडच्या प्रादुर्भावामुळे निर्बंध होते. त्यामुळे भाविकांना मंदिरात येऊन दर्शन घेता आले नाही. यंदा नवरात्रोत्सव निर्बंधमुक्त होत असल्याने भाविकांनी आनंद व्यक्त होत आहे. नवरात्रोत्सवाच्या कालावधीत अनेक भाविक पायी येऊन दर्शन घेत नवस पूर्ण करतात. दोन वर्षानंतर यंदा येथील श्री रेणुका देवी मंदिरात पारंपारिक पद्धतीने भाविकांच्या उपस्थितीत सोमवारी दुपारी १ वा. मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, ट्रस्टचे कार्याध्यक्ष राम पाटील, मंदिराचे मुख्य पुजारी राजू धर्माधिकारी व पुजारी, विश्वस्त मंडळ आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत आई राजा उदे उदे, रेणुका माता की जय असा जयघोष करुन महाआरती करण्यात आली. तसेच श्री रेणुका देवीची मोठ्या उत्साहात घटस्थापना करण्यात आली.
यावेळी मारुती गंगावणे, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, गजानन बोळंगे, म.श. हलकुडे, व्यापारी संघाचे अध्यक्ष रमाकांत वाघमारे, विश्वस्त तुकाराम कोल्हे, ॲड. प्रशांत आकनगिरे, रावसाहेब राठोड, दिलीप आकनगिरे, बापू गिरी, राजू पुनपाळे, पुंडलिक इगे, विठ्ठल कटके, मनोहर व्यवहारे, गुरुसिद्धअप्पा उटगे, मंडळ अधिकारी दिलीप देवकत्ते, तलाठी गोविंद शिंगडे, राहुल भुसनर, निता नारागुडे, चिन्मयी गंगावणे, जयश्री हंबीरे यांच्यासह शहरातील नागरिक, ग्रामस्थ, भाविक उपस्थित होते.