म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही; जिल्ह्यात १२९ रुग्ण !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:38+5:302021-05-28T04:15:38+5:30
लातूर : कोरोनानंतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये जिल्ह्यात वाढ होत असून, आतापर्यंत १२९ रुग्ण आढळले आहेत. यातील ३६ रुग्ण बरे होऊन ...

म्युकरमायकोसिस संपर्कामुळे होत नाही; जिल्ह्यात १२९ रुग्ण !
लातूर : कोरोनानंतर म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये जिल्ह्यात वाढ होत असून, आतापर्यंत १२९ रुग्ण आढळले आहेत. यातील ३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्य:स्थितीत खासगी आणि सरकारी रुग्णालयात मिळून ८१ रुग्ण उपचार घेत आहेत. म्युकरमायकोसिसचा आजार संपर्कातून होत नाही. त्यामुळे या आजाराच्या संदर्भात घाबरण्याचे कारण नसल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले. लातूर जिल्ह्यात प्रारंभी ९५ रुग्ण आढळले होते. त्यानंतर त्यात वाढ झाली असून, १२९ पर्यंत या आजाराच्या रुग्णांची संख्या गेली होती. विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात या रुग्णांच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला असून, तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. खासगीमध्येही काही रुग्ण दाखल आहेत. नोंदणी झालेल्या १२९ पैकी ३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. कोविडसह म्युकरमायकोसिस असलेल्या चौघांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एल.एस. देशमुख यांनी सांगितले.
ॲम्टोटेरेसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा
म्युकरमायकोसिसच्या आजारासाठी ॲम्टोटेरेसिस इंजेक्शनची गरज लागत आहे. या इंजेक्शनचा मागणीप्रमाणे पुरवठा होत नाही. दररोज ३०० इंजेक्शनची मागणी आहे. प्रयत्न करून शंभरच्या आसपास इंजेक्शनचा पुरवठा केला जात आहे. या इंजेक्शनचे उत्पादन कमी असल्यामुळे तुटवडा आहे.
प्रशासनाकडून न्यायिक पद्धतीने उपलब्ध इंजेक्शनचे वितरण गरजेनुसार केले जात आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांच्या नियंत्रणाखाली या इंजेक्शनचे वितरण संबंधित गरजू रुग्णाला केले जात आहे.
बुरशीजन्य आजार आहे. नाका-तोंडातून, शरीरात प्रवेश करते. नाकाला व घश्याला सूज येते. हिरड्यावर व डोळ्यालाही सूज येते. जबड्याच्या वरच्या बाजूस काळे डाग दिसून येतात, अशी लक्षणे या आजाराची आहेत.
अशी घ्या काळजी
कोविडनंतर हा बुरशीजन्य आजार होतो. या आजाराचा संसर्ग नाकापासून सुरू होतो. जबडा, टाळू आणि मेंदूपर्यंत हा आजार पसरू शकतो. त्यामुळे लक्षणे दिसताच तत्काळ वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे गरजेचे आहे.
डॉक्टर म्हणतात
कोविडनंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळत आहेत. जबडा, टाळू, डोळे आणि मेंदूपर्यंत आजार पसरू शकतो. त्यामुळे रुग्णांनी लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भिण्याचे कारण नाही. शिवाय, हा आजार संसर्गजन्य नाही.
- डॉ. हनुमंत किनीकर, आयएमए सचिव
म्युकरमायकोसिस आजार होऊ नये यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी. त्यासाठी व्यायाम, आहार आवश्यक आहे. शरीरातील शुगर नियंत्रणात ठेवावी. नाका-तोंडाची स्वच्छता राखावी. त्रास जाणवत असल्यास तत्काळ कान-नाक-घसा तज्ज्ञांशी सल्ला घ्यावा. - डॉ. श्रीधर पाठक, नेत्रतज्ज्ञ
जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळलेले आहेत. संशयित रुग्णांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डॉ. विनोद कंदाकुरे, तज्ज्ञ