पतसंस्थेत गहाण ठेवलेल्या प्लॉटची परस्पर केली विक्री
By हरी मोकाशे | Updated: May 3, 2023 19:01 IST2023-05-03T19:00:50+5:302023-05-03T19:01:33+5:30
फसवणूक प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

पतसंस्थेत गहाण ठेवलेल्या प्लॉटची परस्पर केली विक्री
उदगीर : शहरातील एका को- ऑप. क्रेडिट सोसायटीत कर्जदाराने गहाण खत करून दिलेल्या प्लॉटची परस्पर विक्री केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पतसंस्थेच्या व्यवस्थापकाच्या तक्रारीवरुन उदगीर शहर पोलिसांत बुधवारी कर्जदार व त्यांचे जामीनदार अशा एकूण चौघांविरुद्ध फसवणूक प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, शहरातील उदयगिरी मल्टी स्टेट को- ऑप. क्रेडिट सोसायटीने कर्जदार सुरज गंगाधर चवळे यांना त्यांच्या व्यवसायासाठी कॅश क्रेडिट म्हणून २० लाखांचे कर्ज दिले होते. त्यापोटी कर्जदार चवळे व जामीनदारांनी पतसंस्थेच्या हक्कात तारण म्हणून लोणी (ता. उदगीर) येथील नोंदणीकृत प्लाॅट गहाणखत करून दिले होते. दरम्यान, ३० जुलै २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कर्जदार चवळे, नम्रता शिवराज शेटे, ऋतुजा शिवराज शेटे, सुशिलाबाई बाबुराव शेटे (सर्वजण रा. उदगीर) यांनी संगनमत करून पतसंस्थेच्या हक्कात तारण ठेवलेल्या प्लॉटची परस्पर विक्री करून पतसंस्थेची फसवणूक केल्याचे उघडकीस आले.
याप्रकरणी पतसंस्थेचे व्यवस्थापक विश्वास सावळे यांनी बुधवारी शहर पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून वरील चौघांविरुद्ध आर्थिक फसवणूक केल्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक के.पी. जाधव ह्या करीत आहेत.