मुलगा दुसऱ्याचा असल्याच्या संशयातून ८ महिन्यांच्या बाळाचा जन्मदात्याकडून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2019 13:51 IST2019-08-12T13:48:44+5:302019-08-12T13:51:46+5:30
गरम ग्लासाचे चटके देणे, डोळ्यात तिखट टाकणे, असा तान्हुल्याचा अनन्वित छळ

मुलगा दुसऱ्याचा असल्याच्या संशयातून ८ महिन्यांच्या बाळाचा जन्मदात्याकडून खून
लातूर : मुलगा आपला नसल्याच्या संशयावरून अवघ्या आठ महिन्यांच्या अर्भकाचा अनन्वित छळ करणाऱ्या पित्याने त्या बाळाची क्रूरपणे हत्या केली़ शनिवारी रात्री ही खळबळजनक घटना लातूर शहरातील संजयनगरात घडली.याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात रविवारी आरोपी सोमनाथ शिवाजी साळुंके याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यास पोलिसांनी अटक केली.
माधुरी व सोमनाथ साळुंके या दाम्पत्याला विवाहानंतर पहिला मुलगा झाला. दुसऱ्यांदाही मुलगा झाला. मात्र तो माझा नाही, असा संशय सोमनाथ घेत होता. या संशयावरून सोमनाथने माधुरीचा छळ सुरू केला.इतकेच नव्हे तर स्वप्नील या आठ महिन्यांच्या चिमुकल्यासही तो मारहाण करत होता़ जिवे मारण्याच्या उद्देशाने सतत चहाच्या गरम ग्लासाचे चटके देणे, डोळ्यात तिखट टाकणे, असा तान्हुल्याचा अनन्वित छळ तो करीत होता. शनिवारी रात्री त्याने स्वप्नीलला चापटा, बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी उलथने आणि दगडी बत्त्याने डोक्यावर मारहाण करून खून केला, असे माधुरी साळुंके (२४, रा़ संजयनगर, लातूर) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे़ पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक डी. एच. पाटील हे करीत आहेत.