महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; १८ बोगस डॉक्टर्स रडारवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:08+5:302021-06-26T04:15:08+5:30
लातूर : मेडिकल कौन्सिलचा कसलाही परवाना नसलेले १८ बोगस डॉक्टर्स जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या रडारवर असून, याप्रकरणी तालुका वैद्यकीय ...

महामारीतही मुन्नाभाई एमबीबीएस जोरात; १८ बोगस डॉक्टर्स रडारवर !
लातूर : मेडिकल कौन्सिलचा कसलाही परवाना नसलेले १८ बोगस डॉक्टर्स जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या रडारवर असून, याप्रकरणी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत तपासणी करून कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, लातूर तालुक्यातील नागझरी व उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे प्रत्येकी एका बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली आहे. तर निलंगा तालुक्यातील हालसी तुगाव येथील एका बोगस डॉक्टरने कारवाईच्या धास्तीने दवाखाना गुंडाळला आहे. कोरोना महामारीच्या काळात बोगस डॉक्टरांची प्रॅक्टिस सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या आहेत. त्याची वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत पडताळणी करून कारवाई करण्यात येत आहे. जिल्ह्यात १८ बोगस डॉक्टर असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याचा कोणताही परवाना अथवा अधिकृत डिग्री नसल्याने या तक्रारी केल्या आहेत. दरम्यान, चौकशीअंती यातील दोघांवर फौजदारी गुन्हा नोंदवला आहे तर एकाने दवाखाना बंद केला असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी सांगितले.
सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ
ग्रामीण भागात मुन्नाभाई एमबीबीएस
कोणत्याही पॅथीची डिग्री नसताना अथवा वैद्यकीय व्यवसाय करण्याचा परवाना नसताना राजरोसपणे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे प्रमाण जिल्ह्यातील ग्रामीण भागात आहे. या अनुषंगाने आलेल्या तक्रारींवरून कारवाई करण्यात येत आहे. कोणतीही पदवी नसताना सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणे चुकीचे असल्याने कारवाईसाठी पथक तैनात आहे. कोरोना काळापूर्वी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत तालुकास्तरावर पथक नेमून बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यात आला होता. त्यावेळी अनेकांवर कारवाईही करण्यात आली होती.
वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशी
ग्रामीण भागात अशा व्यावसायिकांची क्लिनिक काही ठिकाणी आहेत. लातूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, निलंगा, जळकोट आदी तालुक्यांच्या ग्रामीण भागातून या तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत कारवाई करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने दिले आहेत. कोरोना काळात १८ तक्रारी आल्या असून, या तक्रारींच्या अनुषंगाने चौकशी सुरू झालली आहे.
लातूर मनपा, अहमदपूर शहर हद्दीतील तक्रार
लातूर महानगरपालिकेच्या हद्दीत चार बोगस डॉक्टर्स असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून या तक्रारी महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित तक्रारींच्या अनुषंगाने पडताळणी केली असता, दवाखाना आढळला नसल्याचे सांगण्यात आले.
तक्रारींच्या अनुषंगाने कारवाई
लातूर मनपा हद्दीतील दोन, अहमदपूर एक, जळकोट दोन, चाकूर दोन, उदगीर दोन, लातूर दोन, रेणापूर एक, निलंगा एक, अहमदपूर एक अशा तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू झाली असून, दोन प्रकरणांमध्ये कारवाई झाली आहे, असे जिल्हा आरोग्य कार्यालयातून सांगण्यात आले.