वाढवणा मंडलात सर्वाधिक पाऊस, बळीराजाला दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:30+5:302021-07-14T04:23:30+5:30
उदगीर : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी शहर व तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप ...

वाढवणा मंडलात सर्वाधिक पाऊस, बळीराजाला दिलासा
उदगीर : गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने रविवारी सायंकाळी शहर व तालुक्यात हजेरी लावली. त्यामुळे कोमेजून जाणाऱ्या खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, आणखीन मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान, वाढवणा मंडलात सर्वाधिक पाऊस झाला असून, तालुक्यात आतापर्यंत सरासरी ३५२ मिमी पाऊस झाला आहे.
गेल्यावर्षीप्रमाणे याहीवर्षी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मृग नक्षत्रात पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आणि खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली. साधारणपणे २० जूनपर्यंत तालुक्यातील सर्वच भागांत पेरण्या आटोपल्या होत्या. पिकेही चांगली उगवल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत होते. परंतु, त्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात कडक ऊन पडल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले होते.
दरम्यान, २ जुलै व ८ जुलै रोजी तालुक्यातील सर्वच मंडलांत थोडाफार पिकांपुरता पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना धीर आला होता. त्यानंतर पुन्हा रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या आहेत. वाढवणा मंडलात सर्वात जास्त तर मोघा मंडलात सर्वात कमी पाऊस झाल्याची नोंद येथील तहसील कार्यालयात झाली आहे. या पावसामुळे कोवळी पिके आता धोक्याबाहेर येण्यास मदत होणार आहे. तसेच ज्यांच्या पेरण्या जूनच्या पहिल्या आठवड्यात झाल्या आहेत, असे शेतकरी आता फवारणीच्या तयारीला लागले आहेत.
या पावसामुळे तालुक्यातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनसह तूर, उडीद, मूग, ज्वारी या पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या पिकांपुरता पाऊस झाला असला तरी आगामी काळात आणखी मोठ्या पावसाची शेतकरी आशा करत आहेत.
आतापर्यंत तोंडार मंडलात कमी पाऊस...
तालुक्यात रविवारी झालेल्या पावसाची नोंद मिमीमध्ये पुढीलप्रमाणे असून, कंसातील संख्या आतापर्यंतच्या पावसाची : उदगीर १४ (४३५), नागलगाव २५ (३४०), मोघा ७ (३९१), हेर २९ (२७२), वाढवणा ६९ (३५५), नळगीर ३१ (४५३), देवर्जन २३ (३१५), तोंडार ३२ (२५८) मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत एकूण सरासरी ३५२ मिमी पाऊस झाला आहे.
शेतकऱ्यांतून समाधान...
मध्यंतरीच्या काळात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे महागामोलाचे बी-बियाणे, खते निष्फळ जाणार की काय, अशी भीती होती. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. मात्र, गेल्या दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने दिलासा मिळाला आहे. पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस अत्यंत उपयुक्त असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.