मुस्लीम युवकांनी केले शंभराहून अधिक हिंदू कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:15 IST2021-06-25T04:15:39+5:302021-06-25T04:15:39+5:30
उदगीर शहर व परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप घेतले होते. संसर्गजन्य रोगापासून बाधित रुग्ण जवळ जाण्यासाठी त्याचे कुटुंबीयसुद्धा ...

मुस्लीम युवकांनी केले शंभराहून अधिक हिंदू कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार!
उदगीर शहर व परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयंकर रूप घेतले होते. संसर्गजन्य रोगापासून बाधित रुग्ण जवळ जाण्यासाठी त्याचे कुटुंबीयसुद्धा दचकत असत. अशाच बाधितांपैकी कोणाचा मृत्यू पावलेल्या अग्नी देण्यासाठी काही प्रसंगी घरातील कुणी जाण्यास धजावत नव्हते . अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली होती. कोरोना रुग्णालयात अशाप्रकारे मृत्यू झालेल्यांची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर ते कुटुंबीय अंत्यविधीसाठी अतिशय अडचणींमध्ये सापडत होते. अशावेळी नातलगांची अडचण पाहून उदगीर येथे काम करणारे सलात अल्पसंख्यांक बहूद्देशीय सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी ( रोटी कपडा बँक ) यांनी पुढाकार घेत ९ एप्रिल ते १४ मेच्या दरम्यान ११३ कोरोना बाधित हिंदू मृतदेहांवर त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे शहरात व परिसरात ठिकठिकाणी जाऊन अंत्यसंस्कार केले. २९ एप्रिल रोजी तर एकाच दिवशी १६ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नव्हती, अशा कठीण प्रसंगी रोटी कपडा बँकचे पदाधिकारी हे शहरात कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाइकांना शहरातील दानशूर व्यक्तीच्या मदतीने जेवणाची सोय करीत होते. यादरम्यान कोरणामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती. कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे समाजातील नव्हे तर शेजारी- पाजारीसुद्धा अंत्यविधीसाठी येण्यास धजावत नव्हते, ही अडचण लक्षात घेता उदगीर येथील बेघर निवारा चालवणारे काही मुस्लीम युवक यांनी ही अडचण लक्षात घेऊन नगरपालिका प्रशासन व पोलिसांकडून एनओसी घेऊन त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करीत असत. या काळात त्यांनी सोळा मुस्लीम धर्मीयांचादेखील दफनविधी केलेला आहे. समाज एकसंघ रहावा, असा संदेश त्यांनी त्यांच्या कार्यातून दिला आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट घोंगावत असताना प्रत्येक ठिकाणी शासकीय मदत मिळेलच, याची खात्री नसल्यामुळे सामाजिक जबाबदारी म्हणून संस्थेच्या माध्यमातून आम्ही काम केल्याचे शेख गौस यांनी सांगितले. हे काम करत असताना त्यांचे सहकारी सिद्दिकी खुर्शीद आलम, शेख जावेद, शेख महेबुब, शेख समीर, लद्याख दस्तगीर, शेख जमील यांनी दिवस अन् रात्र मेहनत घेतली. रमजान ईदच्या दिवशीसुद्धा अंत्यविधी केल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यासाठी नगरपालिका प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळे हे काम करता आल्याचे त्यांनी नमूद केले.