नैतिक मार्ग हाच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:18 IST2021-01-22T04:18:38+5:302021-01-22T04:18:38+5:30
लातूर : स्वैराचार, अनैतिकतेला आचरणातून हद्दपार करण्यासाठी सतत नैतिक मार्गाचा अवलंब करावा, ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कुराणमध्ये ईश्वराने दिली ...

नैतिक मार्ग हाच यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली
लातूर : स्वैराचार, अनैतिकतेला आचरणातून हद्दपार करण्यासाठी सतत नैतिक मार्गाचा अवलंब करावा, ही यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली कुराणमध्ये ईश्वराने दिली आहे. त्यामुळे त्याचे अध्ययन करावे, असे प्रतिपादन मुजिब देवणीकर यांनी केले.
जमाअत-ए-इस्लामी हिंदच्यावतीने ॲम्बेसी सभागृहात आयोजित ‘अंधारातून प्रकाशाकडे’ या दहा दिवसीय राज्यव्यापी अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष सय्यद मिसबाहोद्दीन हाशमी होते. जयंतराव पाटील, साजिद आझाद, साजिद खान, जुनेद अकबर, आशफाक अहमद शहराध्यक्ष एम. आय. शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी देवणीकर म्हणाले, कुराणचा संदेश सर्व मानव जातीसाठी आहे. जे लोक राग गिळून टाकतात, दुसऱ्याच्या चुका माफ करतात, असे लोक ईश्वराला प्रिय आहेत. त्यामुळे सदाचार आपल्या जीवनाचे अंग बनले पाहिजे. यावेळी किशन पाटील म्हणाले, कुराण पठणामुळे जीवन जगण्याचा मार्ग सापडतो. त्यातून अनेक वाईट गोष्टींपासून माणूस दूर राहतो.
या अभियानातून मास्क वाटप, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व शहरातील नागरिकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यातून कुराण व प्रेषितांचा संदेश पोहोचविला जाणार आहे. प्रास्ताविक शहराध्यक्ष एम. आय. शेख यांनी केले. सूत्रसंचालन बशीर शेख यांनी, तर अबरार मोहसीन यांनी आभार मानले. कार्यक्रमास शहरातील समाजबांधव उपस्थित होते.