लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल, प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक, नागरिकांनी अनुभवला थरार

By राजकुमार जोंधळे | Updated: May 11, 2025 01:19 IST2025-05-11T01:19:20+5:302025-05-11T01:19:59+5:30

Latur News: भारत व पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले. प्रशासनाच्या सतर्कतेच्या प्रात्यक्षिकाबरोबर नागरिकांना कोणत्याही दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.

Mock drill at Latur railway station, demonstration of administration's alertness, citizens experienced thrill | लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल, प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक, नागरिकांनी अनुभवला थरार

लातूर रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल, प्रशासनाच्या सतर्कतेचे घेतले प्रात्यक्षिक, नागरिकांनी अनुभवला थरार

- राजकुमार जाेंधळे 

लातूर - भारत व पाकिस्तानदरम्यानच्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीने शनिवारी दुपारी रेल्वे स्थानकावर मॉक ड्रिल घेण्यात आले. प्रशासनाच्या सतर्कतेच्या प्रात्यक्षिकाबरोबर नागरिकांना कोणत्याही दहशतवादी हल्ल्यावेळी प्रसंगावधान राखून घ्यावयाच्या काळजीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. दरम्यान, या रंगीत तालमीच्या थराराचा नागरिकांनी प्रत्यक्ष अनुभवही घेतला.

शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास लातूर रेल्वे स्थानकात दोन दहशतवाद्यांनी प्रवाशांवर गोळीबार केला, अशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर काही वेळातच जिल्ह्यातील पोलिस यंत्रणा, लातूर महसूल प्रशासन, लोहमार्ग पोलिस, लातूर एटीएस, बीडीएसएस पथक, जिल्हा आरोग्य विभाग, अग्निशमन दलासह इतर विभाग तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही दहशतवाद्यांना ताब्यात घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि घटनेत जखमी झालेल्यांना तत्काळ उपचारासाठी हलविले.
दहशतवाद्यांच्या ताब्यातील बॅगमध्ये स्फोटक पदार्थ असल्याची शक्यता असल्यामुळे बीडीडीएस, आय. कारच्या साह्याने तपासणी करण्यात आली. फॉरेन्सिक लॅबमार्फत घटनास्थळाचे भौतिक दुवे तपासण्यात आले. ट्राफिक अंमलदारांच्या मदतीने रस्त्यावरील गर्दी सुरळीत करण्यात आली. तसेच स्टेशनवरील गोंधळ मेगा फोनद्वारे सूचना देऊन नियंत्रणात आणण्यात आला.

नागरिकांनी गोंधळून जाऊ नये...
मॉक ड्रिलच्या अनुषंगाने सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा प्रकारे काळजी घ्यावी, सुरक्षिततेच्या कोणकोणत्या योजनांचा अवलंब करावा, गोंधळून न जाता संयमाने परिस्थितीस कसे सामोरे जावे, यासंदर्भात अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे यांनी जमलेल्या नागरिकांना मार्गदर्शन केले.

दक्षता नागरिकांच्या सुरक्षेची...
सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘मॉक ड्रिल’ घेण्यात येत आहे. एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने घ्यावयाच्या खबरदारीचा सराव अशा मोहिमांतून करण्यात येत आहे. तसेच प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे. त्यात काय उणिवा राहिल्या आहेत का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

नागरिकांसाठी हेल्पलाईन क्रमांक...
नागरिकांनी जागरूक राहून शहराच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काहीही माहिती असल्यास नियंत्रण कक्ष, लातूर फोन क्र. ०२३८२-२४२२९६, डायल ११२ वर संपर्क करून कळवावे, असे आवाहन जिल्हा पोलिस दलाच्या वतीने करण्यात येत आहे. हा मॉक ड्रिल (रंगीत तालीम) पोलिस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. यात सर्व विभागांचे ४३ अधिकारी, २४० पोलिस अंमलदार व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Mock drill at Latur railway station, demonstration of administration's alertness, citizens experienced thrill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर