मोबाइलमुळे मुलांमध्ये वाढला चिडचिडेपणा, डोकेदुखीचा त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:18 IST2021-03-07T04:18:24+5:302021-03-07T04:18:24+5:30
लातूर : ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हाती अधिक वेळ मोबाइल राहू लागला आहे. त्यामुळे मुले मोबाइल गेम खेळण्यात व्यस्त राहू ...

मोबाइलमुळे मुलांमध्ये वाढला चिडचिडेपणा, डोकेदुखीचा त्रास
लातूर : ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांच्या हाती अधिक वेळ मोबाइल राहू लागला आहे. त्यामुळे मुले मोबाइल गेम खेळण्यात व्यस्त राहू लागले आहेत. त्याचा परिणाम आरोग्यावर होऊन मुलांमध्ये चिडचिडेपणा, डोकेदुखी असा त्रास जाणवू लागला आहे.
कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात आहे. आपला मुलगा इतर मुलांप्रमाणे अभ्यासात अग्रेसर राहावा म्हणून पालकांनी सुरुवातीस तासिकापुरताच मोबाइल दिला. मात्र, वर्ष उलटत आले, तरी ऑनलाइन शिक्षण सुरूच असल्याने नाइलाजास्तव पालकांनी मुलांना स्वतंत्र मोबाइल दिला आहे. ही मुले दिवसातील अधिकाधिक तास मोबाइलवरच व्यस्त राहत आहेत. परिणामी, मैदानी खेळापासून ती दुरावली आहेत. सततच्या मोबाइलवापरामुळे मुलांमध्ये एकाग्रता कमी होऊन चिडचिडेपणा वाढला आहे. शिवाय, डोकेदुखी, डोळेदुखी असे आजार उद्भवत असल्याचे तज्ज्ञ डाॅक्टरांनी सांगितले.
सततच्या मोबाइलमुळे मुले त्यात गुंग होतात. त्यामुळे एकाग्रता कमी होऊन चिडचिडेपणा वाढतो. अनेकदा मुलांमध्ये आपले स्वातंत्र्य हिरावून घेतल्याची भावना निर्माण होऊन समज-गैरसमज पसरतात आणि वादविवाद होतात. मुलांमधील आत्मविश्वास कमी होतो. - डाॅ. आशीष चेपुरे,
मानसोपचारतज्ज्ञ
विटीदांडू, चेंडूफळी, लगोर खेळ गायब
आमच्या लहानपणी लगोर, शिवणापाणी, डफडफानी, विटीदांडू, चोरपोलीस, लपाछपी, चेंडूफळी अशी मैदाने खेळ खेळत असत. त्यामुळे शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होत असे. मात्र, आता मैदानी खेळाऐवजी मुले मोबाइल, टीव्हीवरील बैठ्या खेळांत रमत आहेत. त्यामुळे मुलांमध्ये अबोला, एकलकोंडेपणा वाढत आहे.
- व्यंकट बेंबडे, ज्येष्ठ नागरिक
आम्ही काही मैदानी खेळ खेळतो. मात्र, कोरोनाच्या संकटापासून मोबाइलवरील ऑनलाइन खेळांना अधिक महत्त्व देत आहोत. त्यामुळे जास्तीतजास्त वेळ त्यात जात आहे. त्यामुळे अनेकदा पालक रागावतात.
- करण कांबळे, इस्मालपूर
मी मोबाइलवर ऑनलाइन अभ्यासानंतर काही वेळ मोबाइल गेम खेळतो. त्यात चांगला आनंद मिळतो. अनेकदा पालक रागावतात. त्यामुळे पालकांवर नाराजीही व्यक्त करतो. मैदानी खेळ अत्यंत कमी झाले आहेत.
- हर्षवर्धन बिरादार, लातूर