मनसेचे चाकूरमध्ये हल्लाबोल आंदोलन ! आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांनासोबत घेत समस्यांचा पंचनामा करून घेतला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 19:13 IST2021-03-30T19:11:24+5:302021-03-30T19:13:47+5:30
MNS's Hallabol agitation शहरातील रस्त्याचे निकृष्ट काम, दुषित पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी अशा समस्या आंदोलकांनी आक्रमकतेने मांडल्या.

मनसेचे चाकूरमध्ये हल्लाबोल आंदोलन ! आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांनासोबत घेत समस्यांचा पंचनामा करून घेतला
चाकूर : शहरातील तुंबलेल्या गटारी, दूषित पाणी पुरवठा, रस्त्यावरील पेव्हरब्लॉकचे निकृष्ट काम या विरोधात मंगळवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ.नरसिंह भिकाणे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायतीवर हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. प्रभारी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांना जाब विचारत आंदोलकांनी त्यांना समस्यांचा स्पॉट पंचनामा करण्यास भाग पाडले. यावेळी शहरातील अनेक समस्या त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
शहरातील रस्त्याचे निकृष्ट काम, दुषित पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी अशा समस्या आंदोलकांनी आक्रमकतेने मांडल्या. आंदोलकांनी प्रभारी मुख्याधिकाऱ्यांसोबत घेऊन समस्यांचा पंचनामा करण्यास भाग पाडले. शहरातील पेट्रोलपंपाजवळ पाईपलाईनमधून पाण्याचे फवारे उडतात. तिथेच गटाराचे पाणी तुंबलेले आहे. याच दुषित पाण्याचा शहराला पुरवठा होतो. याचा प्रभारी मुख्याधिकारी मंगेश शिंदे यांच्याकडून प्रथम स्पॉट पंचनामा करून घेण्यात आला. त्यानंतर रस्त्यावरील पेव्हारब्लॉकच्या कामाचा निकृष्ट दर्जा मुख्याधिकारी शिंदे यांना दाखवून पंचनामा करण्यात आला. तसेच पिण्याच्या पाण्याच्या मुख्य टाकीवर जाऊन तेथील अस्वछतेचा देखील मुख्याधिकाऱ्यांनी पंचनामा केला. निकृष्ट कामे करणाऱ्या सबंधित सर्वांवर कारवाईची हमी दिल्यानंतर मनसेने हल्लाबोल आंदोलन थांबवले. आंदोलनात शहराध्यक्ष अजय धनेश्वर, कृषि तालुकाध्यक्ष सुरेश शेवाळे, अजित घंटेवाड, अॅड ओंकार शेटे, महिला तालुकाध्यक्षा सरस्वती नवरखेले, राम कसबे, दत्ता सूर्यवंशी, तुळशीदास माने, विठ्ठल प्रसाद झांबरे, गणेश चौहान,कृष्णा गिरी,सुरज लोंढे आदींचा सहभाग होता.
कर कशासाठी भरायचा
नगरपंचायतीला पाच वर्षात तीन मुख्याधिकारी लाभले. परंतु, एकही मुख्यालयी राहत नसल्याने त्यांना समस्यांची जाण नाही. मुख्याधिकाऱ्यांनी प्रथम मुख्यालयी राहवे, दर्जेदार रस्ते, निर्जंतुक पाणी व गटारांची स्वच्छता हे प्राधान्याने करावे. सर्व नागरिकांचा तो हक्क आहे. कर भरूनही निकृष्ट रस्ते, तुंबलेल्या गटारी व दूषित पाणी मिळत असेल तर नगरपंचायतचे कार्य काय ?असा सवाल जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाणे यांनी केला. यानंतरही प्रश्न मार्गी लागला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.