यशवंत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:20 IST2021-07-29T04:20:41+5:302021-07-29T04:20:41+5:30
लाहोटी कन्या विद्यालयात गुणवंतांचा सत्कार लातूर : येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. ...

यशवंत विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
लाहोटी कन्या विद्यालयात गुणवंतांचा सत्कार
लातूर : येथील श्री गोदावरीदेवी लाहोटी कन्या विद्यालयात दहावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, ॲड.आशिष बाजपाई, शरदकुमार नावंदर, सूर्यप्रकाश धूत, किशोर भराडिया, मुख्याध्यापिका सुनीता बोरगावकर, गायकवाड, ठाकूर यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन सुजाता शास्त्री यांनी तर आभार वर्षा देशपांडे यांनी मानले. बक्षीस वितरणाचे वाचन माया दुधारे, अचला कदम यांनी केले. गुणवंत विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्ती संस्थेकडे रक्कम ठेव स्वरूपात देण्यात आली. यावेळी पालक, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.
हरंगुळ (खु.) शाळेची बाला उपक्रमांतर्गत वाटचाल
लातूर : तालुक्यातील हरंगुळ (खु.) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची बाला उपक्रमांतर्गत वाटचाल सुरू असून, लोकसहभागातून शाळेमध्ये बोअरवेल घेण्यात आला. यावेळी सरपंच दादाराव पवार, उपसरपंच धनराज पाटील, ग्रामविस्तार अधिकारी आशा उस्तुर्गे, सिंधुताई गवळे, अंगद जाधव, अनंत पवार, अमिर शेख, मुख्याध्यापक राजकुमार कांबळे यांची उपस्थिती होती. या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी धनराज गीते, केंद्र प्रमुख इक्राम तांबोळी, युवराज बिडवे यांनी कौतुक केले.
पावसाची उघडीप; शेती कामांना वेग
लातूर : जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे शेतकरी कोळपणीसह फवारणीच्या कामात व्यस्त आहेत. जिल्ह्यात ४ लाख ३० हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. पावसामुळे मशागतीला व्यत्यय येत होता. मात्र, आता पाऊस थांबला असल्याने, खत टाकणे, फवारणी करणे, कोळपणी आदी कामे शेतकरी करीत आहेत. दरम्यान, समाधानकारक पाऊस असल्याने शेतकऱ्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे.
बसेसच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने, राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने शहरांसाठी बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील अनेक गावांत अद्यापही बसेस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातही बसेस सुरू कराव्यात, अशी मागणी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह प्रवाशांमधून होत आहे.
दुभाजकात कचरा; स्वच्छता मोहीम
लातूर : शहरातील मुख्य रस्त्यावरील दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा टाकला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. मनपाच्या वतीने नियमित दुभाजकाची स्वच्छता करण्यात येत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. बार्शी रोड, अंबेजोगाई रोड, औसा रोड या मुख्य मार्गावरील दुभाजकात कचरा आहे. मनपा प्रशासनाने याकडे तत्काळ लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबविण्याची मागणी होत आहे.
ऑनलाइन अभ्यासात नेटवर्कचा अडथळा
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, तर प्राथमिकचे वर्ग ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. दरम्यान, अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल नाहीत. त्यामुळे हे विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत, तर ज्यांच्याकडे मोबाइल आहेत, त्यांना नेटवर्कचा अडथळा येत आहे. त्यामुळे पालकांमधून नाराजी व्यक्त होत असून, विद्यार्थ्यांसाठी गट पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यात यावा, अशी मागणी होत आहे.