विवस्त्र अवस्थेत आढळलेली मनोरुग्ण महिला गर्भवती! लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:38 IST2025-07-04T13:35:53+5:302025-07-04T13:38:40+5:30

मनोवस्था बरी नसल्याने रस्त्याने फिरणाऱ्या एकलकोंड्या महिलांची समस्या गंभीर 

Mentally ill woman found naked is pregnant! Third incident in Latur district | विवस्त्र अवस्थेत आढळलेली मनोरुग्ण महिला गर्भवती! लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

विवस्त्र अवस्थेत आढळलेली मनोरुग्ण महिला गर्भवती! लातूर जिल्ह्यातील तिसरी घटना

लातूर : काही दिवसांपूर्वी मुरुड पोलिस ठाण्याच्या हद्दीत रात्रीच्या वेळी विवस्त्र अवस्थेत फिरणाऱ्या एका महिलेला पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले. दरम्यान, तिथे वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे उघड झाले आहे. मनोवस्था बरी नसल्याने रस्त्याने फिरणाऱ्या एकलकोंड्या महिलांची समस्या गंभीर असून, गुरुवारी समोर आलेली ही तिसरी घटना आहे.

दिवसभर कोठे तरी दडून बसायचे आणि रात्रीच्या वेळी विवस्त्र अवस्थेत एकट्याने फिरायचे, अशा स्थितीतील एक महिला मुरुड परिसरात आढळून आली होती. तिला एका सुजाण महिलेने कपडे देऊन पोलिसांना कळविले. ही माहिती रिलिजन टू रिस्पाॅन्सिबिलिटी संस्थेचे राहुल पाटील यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील मानव सेवा तीर्थ संस्थेचे नरेंद्र पाटील यांच्याशी संपर्क केला. त्यांच्या पुनर्वसन केंद्रात दाखल केले. तिथे महिलेची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर ती गर्भवती असल्याचे उघड झाले. तिथे गरोदर महिलेस ठेवण्यासाठी आवश्यक सुविधा नसल्याने पुन्हा लातूर येथे आणून पुणे हिंजवडी येथील राजेश अग्रवाल यांच्या ‘माझं घर फाउंडेशन’ कडे पाठविले जाणार आहे.

महिलांची सुरक्षा कळीचा मुद्दा
महिलांची सुरक्षा हा नेहमीच कळीचा मुद्दा बनतो. त्यात मनोवस्था बरी नसलेल्या महिलांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. गेल्या काही महिन्यांमध्ये जगण्याचे भान हरपलेल्या महिला गर्भवती अवस्थेत सापडण्याची ही तिसरी घटना आहे, असे सामाजिक कार्यकर्ते राहुल पाटील यांनी गुरुवारी ‘लोकमत’ला सांगितले.

मुरुड पोलिसांचे संस्थेला पत्र
मुरुड पोलिसांनी १ जुलै रोजी पुणे येथील ‘माझं घर फाउंडेशन’ला पत्र पाठविले आहे. त्या महिलेस नाव विचारले असता ती काहीही सांगत नाही. तिच्या नातेवाईकांची माहिती उपलब्ध होत नाही. तिला आधाराची गरज असून, आरटूआर फाउंडेशनचे राहुल पाटील, आकाश गायकवाड, मुस्तफा सय्यद, असिफ पठाण, गोपाळ ओझा यांच्या मार्फत पुण्यातील संस्थेकडे पाठविले जात आहे.

Web Title: Mentally ill woman found naked is pregnant! Third incident in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.