कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे : डॉ. तात्याराव लहाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:15 IST2021-05-31T04:15:34+5:302021-05-31T04:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य उत्तम ...

कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य सांभाळणे गरजेचे : डॉ. तात्याराव लहाने
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोना महामारीला सामोरे जात आहे. कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य उत्तम ठेवणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ तथा वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी केले.
दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद वाणिज्य महाविद्यालयाच्या वाणिज्य मंडळच्यावतीने ‘कोरोना महामारी काळातील मानसिक स्वास्थ्य आणि उत्तम जीवनशैली’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत डाॅ. लहाने बोलत होते. कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, दयानंद शिक्षण संस्थेच्या नियामक मंडळाचे पदाधिकारी, प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार तसेच दयानंद शिक्षण संस्थेंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
प्रास्ताविक प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके यांनी करून कार्यशाळा आयोजनामागील भूमिका सांगितली. यावेळी डॉ. तात्याराव लहाने म्हणाले, कोरोनाची सुरुवात कशी झाली हे माहिती नाही. त्यामुळे हा साथीचा रोग कधी संपेल, याबद्दल निश्चित सांगता येणार नाही. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाने खूप छान पद्धतीने काम केले आहे. महाराष्ट्र हे लोकसंख्येने अतिशय मोठे राज्य आहे. मात्र, उत्तम नियोजनामुळे आपण या महामारीचा सामना योग्यरित्या करू शकलो. कोरोना काळात मानसिक स्वास्थ्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उत्तम आहार, व्यायाम आणि मानसिकता सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे. जो व्यक्ती मानसिक दृष्टीने सक्षम आहे, त्याला कसलीही भीती नसते, असेही ते म्हणाले.
या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. श्रीराम सोळंके, उपप्राचार्य डॉ. राजाराम पवार, डाॅ. विशाल वर्मा, डॉ. स्मिता भक्कड, प्रा. योगेश शर्मा, प्रा. खदीर शेख, प्रा. श्रावण बनसोडे, प्रा. अक्षय पवार, प्रा. लहू शेंडगे, प्रा. सचिन पतंगे, प्रीतम मुळे, आदींनी परिश्रम घेतले.