व्हीएसआयकडून मांजरा साखर कारखान्याचा गौरव; उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राज्यस्तरीय पुरस्कार
By आशपाक पठाण | Updated: January 11, 2024 19:47 IST2024-01-11T19:46:54+5:302024-01-11T19:47:48+5:30
मांजरा कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी हा पुरस्कार स्वीकारला.

व्हीएसआयकडून मांजरा साखर कारखान्याचा गौरव; उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा राज्यस्तरीय पुरस्कार
लातूर : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात येणारा राज्य पातळीवरील उत्तर पूर्व विभागातील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमतेचा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरदचंद्र पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते गुरुवारी प्रदान करण्यात आला.
मांजरा कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, विजयसिंह मोहिते पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी मांजरा कारखान्याचे संचालक अशोकराव काळे, बंकटराव कदम, वसंतराव उफाडे, सदाशिव कदम, कैलास पाटील, ज्ञानेश्वर पवार, शंकर बोळंगे, सूर्यकांत पाटील, नीळकंठ बचाटे (पवार), सचिन शिंदे, धनराज दाताळ, नवनाथ काळे, अनिल दरकसे, शेरखाँ पठाण, तज्ज्ञ संचालक ज्ञानेश्वर भिसे, विशाल पाटील, विलास चामले, कार्यकारी संचालक पंडित देसाई, कारखान्याचे विविध खाते प्रमुख उपस्थित होते.
उत्कृष्ट कार्याचा केला गौरव...
मांजरा साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती घडली. तसेच, नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून कारखान्याने विविध प्रयोग यशस्वी केले, तसेच देशात पहिल्यांदा हार्वेस्टरने उसाची तोडणी करण्याचा विक्रम केला. कारखान्याने गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये मिलमधील उसाचा तंतुमय निर्देशांक, रिड्युस्ट मिल एक्स्ट्रॅक्शन, साखर तयार करण्यासाठी लागणाऱ्या वाफेचा, विजेचा, बगॅस वापर, गाळप क्षमतेच्या वापरामध्ये वाढ, गाळप क्षमतेचा वापर, तसेच इतर निकष पाहता सदरील पुरस्कार विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यास देण्यात आला आहे.