अहमदपूर बाजार समितीच्या सभापतीपदी मंचकराव पाटील
By संदीप शिंदे | Updated: May 23, 2023 18:07 IST2023-05-23T18:02:02+5:302023-05-23T18:07:15+5:30
उपसभापतीपदी काँग्रेसचे संजय पवार यांची निवड

अहमदपूर बाजार समितीच्या सभापतीपदी मंचकराव पाटील
अहमदपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी मंगळवारी निवडणुक प्रक्रिया पार पडली. यावेळी सभापतीपदी मंचकराव पाटील तर उपसभापतीपदी संजय पवार यांची निवड करण्यात आली.
बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला १३ तर तर भाजपा-युतीच्या शेतकरी विकास पॅनलला पाच जागांवर विजय मिळाला होता. मंगळवारी बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी एम.एस .लटपटे यांच्या उपस्थितीमध्ये सभापती व उपसभापती पदांची निवडणूक प्रक्रिया घेण्यात आली. त्यात सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंचकराव पाटील तर उपसभापतीपदी काँग्रेसचे संजय पवार यांची निवड झाली. विरोधी गटाकडून सभापतीपदासाठी जीवनकुमार मद्देवाड आणि उपसभापती पदासाठी अण्णासाहेब कांबळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दरम्यान, निवड जाहीर होताच महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोरील मैदानावर मतदारांचे आभार मानण्यासाठी जाहीर सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सांबप्पा महाजन होते. तर मंचावर आ. बाबासाहेब पाटील, सभापती मंचकराव पाटील, उपसभापती संजय पवार, शिवानंद हेंगणे, शिवाजीराव देशमुख, शंकरराव गुट्टे, साहेबराव जाधव, ॲड. हेमंतराव पाटील, विश्वंभर पाटील, ज्योतीताई पवार, विकास महाजन, निवृत्तीराव कांबळे, माधराव जाधव आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
बाजार समितीच्या विकासासाठी कटीबद्ध...
बाजार समितीची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर जिंकली असून, बाजार समितीमध्ये पारदर्शक व्यवहार, कॉम्प्यूटराईज्ड कामकाज, समितीसाठी इमारत, संरक्षण भिंत बांधकाम, शेतकरी विसावा, शौचालय यासह विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. मतदारसंघात विकास कामांसाठी ६०० ते ७०० कोटी रुपयांचा निधी खेचून आणला असून, बाजार समितीच्या विकासासाठी सदैव तत्पर असल्याचे यावेळी आ. बाबासाहेब पाटील म्हणाले.