जळकाेट येथील राष्ट्रीय महामार्ग चाळीस फुटांचा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:30+5:302021-02-10T04:19:30+5:30
जळकाेट येथे १९७८ राेजी मंजूर झालेल्या रस्त्यानुसार येथील नागरिकांनी आपल्या घर आणि दुकानांचे बांधकाम केले आहे. मात्र, सध्या ...

जळकाेट येथील राष्ट्रीय महामार्ग चाळीस फुटांचा करा
जळकाेट येथे १९७८ राेजी मंजूर झालेल्या रस्त्यानुसार येथील नागरिकांनी आपल्या घर आणि दुकानांचे बांधकाम केले आहे. मात्र, सध्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५-१५ मीटर गटारीचे बांधकाम होणार आहे. यामुळे घरे, दुकाने अतिक्रमणाच्या कक्षेत आली असून, ती काढून घ्यावीत, अशा ताेंडी सूचना देण्यात आल्या आहेत. परिणामी, जळकाेट येथील इमारतींना याचा मोठा फटका बसणार आहे. हा रस्ता १९७८ मध्ये मंजूर झाला होता. तेव्हा रस्त्याच्या दाेन्ही बाजूंना बारा मीटरचे भू-संपादन करण्यात आले हाेते. त्यामुळे रस्त्यालगत शासकीय कार्यालयाचे बांधकाम, बीएसएनएलचे बांधकाम, संरक्षक भिंत, एसटी महामंडळाच्या बसस्थानकांची संरक्षक भिंत बारा मीटरनुसारच उभारण्यात आली आहे. हे बांधकाम नियमानुसार आहे. मात्र, आता रस्त्याच्या कामामुळे यावर संक्रांत आली आहे. या रस्त्याचे रूपांतर महामार्ग झाल्यानंतर १५ मीटर भूसंपादन करण्याबाबत कुठल्याच लेखी स्वरूपाच्या नाेटिसा बजावण्यात आल्या नाहीत. सदर जागेचा मावेजाही देण्यात आला नाही. आता रस्त्याच्या दोन्ही बाजूंना १५ मीटरनुसार नालीवर बांधकाम झाले, तर मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. ते नुकसान थांबवावे, अशी मागणी पालकमंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसाेडे, जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे नागरिकांनी केली आहे.
निवेदनावर माधव धूळशेटे, विनायक डांगे, प्रकाश दिंडे, भागीरथीबाई किडे, गजेंद्र किडे, बालाजी दिंडे, रामदास शेट्टी, हिदायतुल्ला तांबोळी, अजीम लाइटवाले, संभाजी कामटे, गोविंद डांगे, रघुनाथ कामशेट्टी, डॉ. तानाजी चंदावार, शिवलिंग बोधले, बाबूराव गावे आदींची स्वाक्षरी आहे.