कमी दाबाने वीज पुरवठा, शेतकऱ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST2020-12-31T04:20:12+5:302020-12-31T04:20:12+5:30
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी लातूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्याची मागणी होत आहे. लातूर, औसा, निलंगा, उदगीर, ...

कमी दाबाने वीज पुरवठा, शेतकऱ्यांचे नुकसान
प्रवासी निवारा उभारण्याची मागणी
लातूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी प्रवासी निवारा उभारण्याची मागणी होत आहे. लातूर, औसा, निलंगा, उदगीर, अहमदपूर या पाच आगारांतून जिल्ह्यातील विविध गावांत एसटी महामंडळाच्या वतीने प्रवासी वाहतूक केली जाते. प्रवासी निवारा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. एस.टी. महामंडळाने प्रमुख बस थांब्यावर प्रवासी निवारा उभारावा, अशी मागणी होत आहे.
महापालिकेच्या वतीने ‘मी सौभाग्यवती’ स्पर्धा
लातूर : शहर महापालिकेच्या वतीने ‘मी सौभाग्यवती’ स्पर्धा घेण्यात येणार आहे. या अनुषंगाने महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी कंपोस्टिंग कसे तयार करावे, याबाबत स्वच्छता ताईंना मार्गदर्शन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात बैठक पार पडली. या स्पर्धेच्या माध्यमातून होम कंपोस्टिंगला चालना दिली जाणार आहे. तसेच स्पर्धेतील विजेत्या गटांना पारितोषिकांचे वितरण केले जाणार असल्याचे मनपाच्या वतीने सांगण्यात आले.
लातुरातील बाजारात सोयाबीनची आवक वाढली
लातूर : शहरातील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली आहे. सर्वसाधारण ४ हजार २०० रुपयांचा दर मिळत आहे. यासोबतच गहू, बाजरी, ज्वारी, मूग, तूर, करडई आदी शेतमालांची आवक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करीत व्यवहार सुरळीतपणे पार पाडले जात असल्याचे सांगण्यात आले.
पाटोदा (बु.) येथे तूर पिकांची पाहणी
लातूर : जळकोट तालुक्यातील पाटोदा (बु.) येथे तूर नुकसानीची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी महेश तीर्थंकर, आकाश पवार, बी.एम. पवार, एम.ए. पवार, बाबुराव गुट्टे, शिवसांब वाडकर, बालाजी दांडगे, शंकर पवार, बालाजी बिरादार, शिवदास काळे आदींसह परिसरातील शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
रबी पीक कर्ज वाटपाला गती
लातूर : रबी हंगामात पीक कर्ज वाटप करण्याच्या सूचना जिल्हातील बँकांना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, राष्ट्रीयकृत बँकांच्या वतीने पीककर्ज वाटप केले जात आहे. खरीप हंगामातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे रबी हंगामातील पिकांकडून चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. रबी पिकांना खते, फवारणीसाठी आर्थिक अडचण असल्याने अनेक शेतकरी बँकेकडे कर्जाची मागणी करीत आहेत.
फलोत्पादन विकास अभियानासाठी अर्ज
लातूर : एकात्मिक फलोत्पादन अभियान २०२०-२१ साठी फळ पीक लागवड, मशरुम उत्पादन, शेड-नेट हाऊस, प्लास्टिक मल्चिंग, २० एचपी ट्रॅक्टर, शेतकरी अभ्यास दौरा, सामूहिक शेततळे, वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण, कांदा चाळ, पॅक हाऊस, प्राथमिक प्रक्रिया केंद्र आदी घटकांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारले जात आहेत. ३१ डिसेंबर अर्ज करण्याची अंतिम मुदत असून, महाडीबीटी पोर्टलवर अर्ज स्वीकारले जात आहे. शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
निवासी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश
लातूर : २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर या जिल्ह्यांतील अनुसूचित जमातीच्या मुला-मुलींना पहिली व दुसरीमध्ये इंग्रजी माध्यमांच्या निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करावे लागणार असून, उत्पन्न मर्यादा १ लाख ठरविण्यात आली आहे. २८ फेब्रुवारी २०२१ अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत असून, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात अर्ज जमा करावेत, असे आवाहन श्रीपाद म्हेत्रे यांनी केले आहे.
जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले
लातूर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या ३१७ जणांवर उपचार सुरू असून, यापैकी १५७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. मनपा आणि आरोग्य विभागाच्या वतीने रॅपिड तसेच प्रयोगशाळेतील चाचण्यांमध्ये वाढ करण्यात आली असून, दररोज सहाशेहून अधिक चाचण्या केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.
सात दिवसीय पाली भाषा मार्गदर्शन वर्ग
लातूर : पाली भाषेचे ज्ञान अवगत व्हावे, यासाठी जानेवारी २०२१ मध्ये लातुरात ७ दिवसीय मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सहभागी होण्याचे आवाहन भन्ते पय्यानंद यांनी केले आहे. पाली भाषेची प्राथमिक स्वरूपात ओळख होणे महत्वाचे आहे. त्यामुळे मार्गदर्शन वर्ग घेण्यात येणार आहेत. नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे संयोजकांनी सांगितले.
रिंग रोडवर गतिरोधक बसविण्याची मागणी
लातूर : एमआयडीसी परिसरातील रिंग रोडचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे गतिरोधक बसविण्याची मागणी स्थानिक रहिवाशांमधून होत आहे. सायंकाळच्या वेळी या रस्त्यावर वाहनांची ये-जा असते. त्यातच रस्त्याच्या कडेला अनेकजण वाहने पार्किंग करतात.
लायनेस क्लबच्या वतीने सत्कार कार्यक्रम
लातूर : लायनेस क्लब लातूरच्या वतीने उद्योजिका मोहर कुंभार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी लायनेस क्लबच्या डिस्ट्रीक्ट उपप्रांताध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, डॉ. क्रांती मोरे-लाटकर, ॲड. रजनी गिरवलकर, संजीवनी कराड, सुनीता मोरे, प्रा. संजयादेवी पवार-गोरे, डॉ. कुसुमताई मोरे, विद्याताई देशमुख आदींसह लायनेस क्लबच्या सदस्यांची उपस्थिती होती.
क्षयरोग, कुष्ठरोग रुग्णांची तपासणी
लातूर : जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने १ ते १५ डिसेंबर या कालावधीत क्षयरोग, कुष्ठरोग रुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत आढळलेल्या संशयितांची आरोग्य तपासणी तसेच आवश्यक असलेल्या चाचण्या केल्या जात आहेत. जिल्ह्यात जवळपास ८३ क्षयरुग्ण आढळले होते. या सर्वांवर योग्य औषधोपचार केले जात असून, आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन केले जात आहे.