Lok Sabha Election 2019 : लातुरात तिघांचे पाच उमेदवारी अर्ज अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 15:57 IST2019-03-27T15:56:08+5:302019-03-27T15:57:52+5:30
१२ उमेदवारांचे २२ अर्ज ठरले वैध

Lok Sabha Election 2019 : लातुरात तिघांचे पाच उमेदवारी अर्ज अवैध
लातूर : लातूर लोकसभा राखीव मतदारसंघासाठी दाखल झालेल्या अर्जांची बुधवारी सकाळी छाननी करण्यात आली़. यात २७ अर्जांपैकी ५ अर्ज अवैध ठरले आहेत़.
लातूर लोकसभा निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या १५ जणांनी मंगळवारपर्यंत २७ अर्ज दाखल केले होते़. या अर्जांची बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात छाननी करण्यात आली़ त्यात संजय दोरवे,विकास कांबळे, भगवान कुमठेकर या उमेदवारांचे ५ अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत़. याशिवाय अपक्ष असलेले मधुकर कांबळे यांचा दोनपैकी एक अर्ज बाद झाला आहे. अन्य प्रमुख उमेदवारांसह १२ उमेदवारांचे २२ अर्ज वैध ठरले आहेत़.
यात प्रामुख्याने काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार मच्छिंद्र कामंत, भाजपा महायुतीचे उमेदवार सुधाकर शृंगारे, वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर, बसपाचे सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्यासह अपक्ष उमेदवारांच्या अर्जाचा समावेश आहे़. २९ मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे़ या कालावधीत कोण-कोण माघार घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत़
यामुळे ठरले अर्ज अवैध़़
अर्ज अवैध ठरलेल्या तीनपैकी एका उमेदवारांनी आपले प्रतिज्ञापत्र अपूर्ण व आवश्यक माहिती न भरल्यामुळे अवैध ठरले. तर संजय दोरवे यांनी भाजपाकडून अर्ज दाखल केला होता, विकास कांबळे यांनी वंचित आघाडीकडून अर्ज भरला होता. या दोघांच्या अर्जासोबत ए बी फॉर्म नसल्याने अर्ज अवैध ठरल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़.