अनेक गावांत छुप्या मार्गाने दारू विक्री; हडोळतीत ‘आडवी बाटली झाली उभी’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 04:33 IST2020-12-14T04:33:16+5:302020-12-14T04:33:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : जिल्ह्यात एकूण जवळपास ७७५ गावांची संख्या आहे. अनेक गावांत छुप्या मार्गाने दारूविक्री केली जाते. ...

अनेक गावांत छुप्या मार्गाने दारू विक्री; हडोळतीत ‘आडवी बाटली झाली उभी’ !
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : जिल्ह्यात एकूण जवळपास ७७५ गावांची संख्या आहे. अनेक गावांत छुप्या मार्गाने दारूविक्री केली जाते. याला प्रतिबंध घालण्यासाठी स्थानिक पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाकडून कारवाई केली जाते. २००६ मध्ये अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथे मतदान प्रक्रियेतून उभी बाटली आडवी करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी २०१६ मध्ये आडवी बाटली उभी करण्यासाठी मतदान झाले. यामध्ये गावातील दारूबंदी उठविण्यात आली.
लातूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दप्तरी नोंद असलेल्या ९२ देशी दारू विक्रीची दुकाने आहेत. ३७५ ठिकाणी परमिट रुमचे परवाने आहेत. ११५ जणांनी बीअर शाॅपीचे परवाने घेतले आहेत. लाॅकडाऊनमुळे बीअर शाॅपीच्या परवान्यांचे नूतनीकरण काही प्रमाणात रखडले आहे. आता या परवान्यांचे नूतनीकरण होईल. जिल्ह्यात एकूण १० वाईन शाॅप आहेत. ज्या गावात अधिकृत मद्य विक्रीचे दुकान नाही, त्या गावामध्ये छुप्या मार्गाने दारू विक्री होत असल्याचे समोर आले आहे.
आमची कारवाई सुरूच
जिल्ह्यात जवळपास ५९२ अधिकृत देशी, विदेशी मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्याशिवाय ज्या गावांत परवाना नाही, अशा गावांत छुप्या मार्गाने दारू विक्री होत असेल, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने छापा मारला जातो. या प्रकरणी गुन्हेही दाखल केले जातात.
- गणेश बारगजे,
अधीक्षक,
दारूबंदीची गरज
दारू विक्रीतून आणि सेवनातून कौटुंबिक आणि सामाजिक शांतता धोक्यात येते, हा अनुभव गावपातळीवर आम्हाला सातत्याने येतो. छोट्या-छोट्या गावांत छुप्या मार्गाने विक्री होणाऱ्या दारूमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागले आहेत. कौटुंबिक वादातून हाणामाऱ्यांच्याही घटनाही घडल्या आहेत. ग्रामीण भागातील दारूबंदी गरजेची आहे.
- अंगद किनीकर
२०१६ नंतर दारू विक्री
लातूर जिल्ह्यात हडोळती येथे २००६ मध्ये महिलांच्या आंदोलनातून दारूबंदी करण्यात आली होती. त्यानंतर २०१६ मध्ये दारूबंदी उठविण्यासाठी पुन्हा मतदान घेण्यात आले. लातूर जिल्ह्यात दारूबंदी असलेले हडोळती हे एकमेव गाव होते. आता या गावात अधिकृत दारू विक्री होत आहे.
- एकनाथ पवार,