लिंबाळवाडीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:02+5:302021-05-01T04:18:02+5:30
चाकूर : तालुक्यातील लिंबाळवाडी येथे एका कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या १८८वर पोहोचली होती. प्रशासनाने तातडीने ...

लिंबाळवाडीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु
चाकूर : तालुक्यातील लिंबाळवाडी येथे एका कार्यक्रमातून कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे बाधितांची संख्या १८८वर पोहोचली होती. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन गाव आठ दिवसांसाठी बंद केले होते. परिणामी, संसर्ग रोखण्यास मदत झाली असून, आता गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. सध्या केवळ १४ ॲक्टिव्ह रुग्ण असून, ते उपचार घेत आहेत.
चाकूर तालुक्यातील लिंबाळवाडी हे १२०० लोकसंख्येचे गाव आहे. गावात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात धार्मिक कार्यक्रम झाला. त्यास गावातील अबालवृद्ध हजर होते. तेथून गावात कोरोनाचा शिरकाव झाला आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावातील एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली. दिवसेंदिवस संसर्ग वाढू लागला. त्यामुळे प्रशासनही हादरले. गावात कोविड चाचणी करण्यात आली. तेव्हा १८८ बाधित आढळले. त्यामुळे प्रशासनाने गावबंद केले.
गावातच राहून काहीजण उपचारानंतर बरे झाले. काहींना चाकूरच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. याच कालावधीत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला. दरम्यान, प्रशासनाने केलेल्या सूचनांचे गावकऱ्यांनी काटेकोरपणे पालन केले. त्यामुळे संसर्ग रोखण्यास मदत झाली असून, आज गाव या संकटातून सावरले आहे. आता गावात कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सर्वजण कडक निर्बंध पाळत आहेत.
गावातील प्रत्येक घरात पॉझिटिव्ह...
गावात कोरोनाचा संसर्ग होईल, असे वाटत नव्हते. सुरुवातीस एकजण पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर संसर्ग सुरु झाला आणि गावातील प्रत्येक घरात पॉझिटिव्ह आढळत होता. प्रशासनाने तत्काळ कठोर पावले उचलली. सर्व गावकऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. गावकरी आज एकदिलाने या संकटातून बाहेर आले आहेत, असे लिंबाळावाडीचे सरपंच शरण बिराजदार यांनी सांगितले.
मास्कशिवाय कोणीही घराबाहेर येत नाही...
कोरोनाच्या संसर्गानंतर गावात शांतता आहे. अबालवृध्द मास्कशिवाय घराबाहेर पडत नाहीत. गावातील कोणीही कोणाच्याही घरी जात नाहीत. गावातील धार्मिक कार्यक्रमानिमित्ताने आम्ही एकत्र आलो होतो. मला काही त्रास झाला नाही. मात्र, दाेन नाती पॉझिटिव्ह आल्या होत्या. त्याही आता ठणठणीत झाल्या आहेत, असे गावातील सगुणाबाई बिराजदार यांनी सांगितले.
नियमांचे काटेकोरपणे पालन...
आता गावची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु आहे. कोरोनामुळे गावातील तिघांचा मृत्यू झाला आहे. आता गावातील प्रत्येकजण नियमांचे पालन करीत आहे. सर्वजण फिजिकल डिस्टन्स ठेवून एकमेकांशी बोलतात. गावातही जागृती होण्यासाठी गावाला बरेच मूल्य द्यावे लागले आहे, असे गावकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, लिंबाळवाडीतील घटनेला जबाबदार कोण, हे प्रशासनाने अद्याप निश्चित केले नाही.