आता हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:14 IST2021-07-04T04:14:55+5:302021-07-04T04:14:55+5:30
शुभमुहूर्त... लातूर जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात निर्बंध जारी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. ...

आता हाेऊन जाऊ द्या शुभमंगल सावधान !
शुभमुहूर्त...
लातूर जिल्ह्यात डेल्टा प्लसच्या पार्श्वभूमीवर जूनच्या शेवटच्या आठवड्यात निर्बंध जारी करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. परिणामी, विवाह सोहळ्यावरही निर्बंध आले आहेत. जुलै महिन्यात ५ विवाहाचे मुहूर्त आहेत. अनेकांनी या तारखा बुक केल्या आहेत. यामध्ये २२, २५, २६, २८, २९ जुलै या तारखेला लग्न सोहळ्यांचा बार उडणार आहे.
असे आहेत नियम...
कोरोनामुळे विवाह सोहळ्यांना नव्याने नियम आणि निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी तिसऱ्या लाटेची चर्चा आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले होते. मात्र पुन्हा डेल्टा प्लसच्या भीतीने रात्री संचारबंदी आणि दिवसा जमावबंदी आदेश जारी केले. आठवड्यातील दोन दिवस शनिवार आणि रविवार वीकेंड लॉकडाऊन आहे.
परवानगीसाठी अग्निदिव्य...
मार्च २०२० पासून सुरू असलेल्या कोरोना महामारीने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. परिणामी, विवाह सोहळ्यावर निर्बंध आले आहेत. आता केवळ ५० जणांच्या उपस्थितीतच लग्न उरकावे लागणार आहे.
यासाठी वरपिता आणि वधुपिता यांन परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी जवळच्या पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागणार आहे. परवानगीनंतरच विवाह सोहळा उरकता येईल. या सोहळ्यासाठी केवळ ५० जणांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. सोहळ्यादरम्यान कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे. शिवाय, मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टन्सिंग पाळावे लागणार आहे.
वधू-वरपित्याची कसरत...
गतवर्षीपासून कोरोनामुळे विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला होता. आता नियम शिथिल झाल्याने पुन्हा विवाह सोहळे होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यातील तारखा रद्द कराव्या लागल्या. कोरोनाची रुग्णसंख्या ओसरल्याने जुलै महिन्यातील तारीख अनेकांनी काढली आहे. आता मात्र केवळ ५० व्यक्तींनाच परवानगी देण्यात आल्याने अडचणीत भर पडली आहे. कुटुंबातील आणि आप्तस्वकीय ५० पेक्षा अधिक असतात. निमंत्रण पत्रिका देण्याची मोठी कसरत आहे.
विवाह सोहळ्यासाठी जुलै महिन्यात पाच मुहूर्त आहेत.
कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने जुलै महिन्यात विवाह सोहळे उरकता येतील, असा बेत आहे. अनेकदा लॉकडाऊन आणि निर्बंधांमुळे तारखा पुढे ढकलण्याची वेळ कुटुंब प्रमुखावर आली. आता पन्नास व्यक्तींचीच मर्यादा ठेवण्यात आल्याने अडचणी वाढल्या आहेत. परिणामी, वधू आणि वरपित्याची चिंता वाढली आहे. कोणाला निमंत्रण द्यायचे आणि कोणाला नाही, हा प्रश्न अनेक कुटुंबप्रमुखांना पडला आहे. यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.