उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:18 IST2021-05-24T04:18:46+5:302021-05-24T04:18:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क उदगीर : डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आयातीला परवानगी दिली. त्यामुळे मागील आठवड्यापासून ...

उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याला हमीभावापेक्षा कमी दर
लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याने केंद्र सरकारने आयातीला परवानगी दिली. त्यामुळे मागील आठवड्यापासून दरात घसरण होत असल्याचे उदगीर बाजार समितीत शनिवार व रविवारी दिसून आले. शनिवारच्या सौद्यात हरभऱ्याला प्रति क्विंटलमागे हमीभावापेक्षा ५०० रुपये कमी मिळाले, तर सोयाबीन व तुरीच्या दरातही घसरण झाली. खरिपाच्या तोंडावर शेतमाल विक्रीसाठी घेऊन आलेले शेतकरी अडचणीत सापडले आहेत. दरम्यान, सौद्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या नियमांकडे व्यापाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे.
सीमावर्ती भागातील मोठी बाजारपेठ असलेल्या उदगीरच्या मार्केट यार्डात शेतमालाची आवक वाढली आहे. मागील महिन्यात हरभरा ५ हजार ३०० रुपये, सोयाबीन ७ हजार ७०० रुपये तर तुरीचा प्रतिक्विंटल दर ७ हजार १०० रुपयांपर्यंत पोहोचला होता. हवामान खात्याने यावर्षी सर्वसाधारण पाऊस होईल, असा अंदाज वर्तविला आहे. जून महिना तोंडावर आल्याने पेरणीच्या खर्चासाठी शेतकरी आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. परंतु, केंद्र सरकारने डाळवर्गीय धान्याचे दर वाढत असल्याचे कारण देत विदेशातून आयातीला परवानगी दिली. त्यामुळे हरभऱ्याचे दर ५०० रुपये तर तूर व सोयाबीनच्या दरात ७०० रुपयांनी घसरण झाली आहे. हमीभाव खरेदी केंद्र २५ मेपर्यंत सुरु ठेवण्याची मुदत असल्याने किमान हमीभाव केंद्राला सरकारने मुदतवाढ द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत.
तीन राज्यांच्या सीमेवरील असलेल्या उदगीरच्या मार्केट यार्डात नांदेड जिल्ह्यातील काही गावांतून शेतमालाची आवक होत आहे. शनिवारी व रविवारी वीकेंड लॉकडाऊन असल्याने शहरातील सर्वच बाजारपेठा कडकडीत बंद आहेत. शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी काही नियम लागू करुन बाजार समितीतील व्यवहाराला परवानगी दिली आहे. त्यावर पालिकेने लक्ष ठेवण्याची सूचना केली आहे. परंतु, येथील मोढ्यांत कुठलेही नियम पाळले जात नाहीत. व्यापाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सकाळी सौद्यावेळी अक्षरशः यात्रेसारखी गर्दी दिसते. याकडे बाजार समितीने लक्ष देण्याची गरज आहे. ज्यामुळे बाहेरगावाहून शेतमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसह बाजारातील अन्य घटकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही.
मास्कचा वापर करुन व्यवहार...
दररोज सकाळी ११ वाजता सौदा निघतो. काहीही केल्यास तासभर सौद्यात गर्दी होतेच. ती रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मात्र, फारसा उपयोग होत नाही. परंतु, प्रत्येकजण चेहऱ्याला मास्क लावूनच व्यवहार करतो.
- संभाजी घोगरे, अध्यक्ष, आडत असोसिएशन.
व्यापाऱ्यांना वारंवार सूचना...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी कमी करण्यासाठी बाजार समितीचे कर्मचारी सतत प्रयत्न करत आहेत. परंतु, व्यापारी ऐकत नाहीत. त्यासाठी मंगळवारपासून काही नवीन भूमिका घेतली जाईल.
- एन. डी. हंगरगे, प्रभारी सचिव.