पाणीपुरवठ्याच्या व्हाॅल्व्हला गळती, शेकडो लिटर्स पाणी वाया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:18 IST2021-05-23T04:18:44+5:302021-05-23T04:18:44+5:30
शिरूर अनंतपाळ : शहरासाठी घरणी प्रकल्पावरून पाणीपुरवठा होणाऱ्या व्हाॅल्व्हला राज्यमार्गाशेजारी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे शेकडो लिटर्स पाणी ...

पाणीपुरवठ्याच्या व्हाॅल्व्हला गळती, शेकडो लिटर्स पाणी वाया
शिरूर अनंतपाळ : शहरासाठी घरणी प्रकल्पावरून पाणीपुरवठा होणाऱ्या व्हाॅल्व्हला राज्यमार्गाशेजारी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे शेकडो लिटर्स पाणी वाया जात आहे. याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे व्हाॅल्व्हची दुरुस्ती करून गळती बंद करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शहराचा विस्तार वाढल्याने स्थानिक पातळीवरील पाणीपुरवठा योजना तोकडी पडत आहे. त्यातच उन्हाची तीव्रता वाढल्याने अनेकांच्या विंधन विहिरी बंद पडत आहेत. शहराच्या सर्व भागात पाणीपुरवठा व्हावा म्हणून घरणी प्रकल्पावरून करण्यात आलेली पाणीपुरवठा योजना पुन्हा सुरू करून तीन ते चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. परंतु, या पाणीपुरवठा योजनेच्या व्हाॅल्व्हला राज्यमार्गाशेजारी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे शेकडो लिटर्स पाणी वाया जात आहे. याकडे नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. व्हाॅल्व्हची दुरुस्ती करून गळती बंद करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
प्रकल्पात मर्यादित पाणीसाठा...
घरणी प्रकल्प गतवर्षीच्या पावसाळ्यात शंभर टक्के भरला होता. परंतु, सध्या प्रकल्पात ५.६६६ दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे. केवळ २५.२२ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातच सिंचन क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत आहे. आता त्यात भर पडली असून, व्हाॅल्व्हला गळती लागल्यामुळे शेकडो लिटर्स पाणी वाया जात आहे.
व्हाॅल्व्हची तत्काळ दुरुस्ती...
व्हाॅल्व्हची गळती थांबविण्यासाठी तत्काळ व्हाॅल्व्हची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एन. पी. विभूते, वरिष्ठ सहायक वाले यांनी सांगितले.