लातूरच्या सुपुत्राचे शिष्य टोकिओ ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:14 IST2021-07-21T04:14:49+5:302021-07-21T04:14:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : क्रीडा क्षेत्राला लातूरने अनेक रत्ने दिली आहेत. लातूरच्या या मातीचा सुगंध क्रीडा क्षेत्रात नेहमीच ...

लातूरच्या सुपुत्राचे शिष्य टोकिओ ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : क्रीडा क्षेत्राला लातूरने अनेक रत्ने दिली आहेत. लातूरच्या या मातीचा सुगंध क्रीडा क्षेत्रात नेहमीच दरवळत असतो. हरिश्चंद्र बिराजदार, काका पवार व माजी ऑलिम्पियन कॅप्टन शाहूराज बिराजदार यांनी लातूरचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकविले आहे. नुकत्याच होणाऱ्या टोकिओ ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग क्रीडा प्रकारात लातूरचे सुपुत्र शाहूराज बिराजदार यांचे दोन शिष्य भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी बजावत आहेत. त्यामुळे लातूर पुन्हा प्रसिद्ध झाले आहे.
निलंगा तालुक्यातील हरिजवळगा येथील मूळचे असलेले कॅप्टन शाहूराज बिराजदार यांचे बॉक्सिंग खेळात योगदान आहे. सेऊल ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करीत लातूरचे नाव उज्ज्वल केले होते. यासह १२ जागतिक स्पर्धेत त्यांनी विजय प्राप्त केला आहे. आशियाई स्पर्धेत रौप्य, तर कॉमन वेल्थ स्पर्धेत त्यांनी सुवर्णपदक पटकाविले होते. केंद्र शासनाचा ध्यानचंद पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. पुणे येथे सैन्य दलात कार्यरत असताना त्यांनी अनेक किताबी लढती जिंकल्या आहेत. आपल्या खेळाची कारकीर्द संपल्यानंतर त्यांनी एक वर्षाचा खेळातील प्रशिक्षकाचा एनआयएस डिप्लोमा केला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो खेळाडूंनी राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत छाप सोडली आहे. कास्यपदक विजेती मेरीकोमचे प्रशिक्षक छोटेलाल यादव व कोल्हापूरचे जयसिंग पाटील हे शाहूराज बिराजदारांचे शिष्य. हे दोघेही सध्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. एकंदरीत, लातूरच्या सुपुत्राचा डंका आजही सातासमुद्रापार वाजत आहे.
कौशल्याची केली पायाभरणी...
टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सध्या मेरिकोमचे प्रशिक्षक असलेले छोटेलाल यादव व मुलांचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत असलेले जयसिंग पाटील यांना पुण्यातील बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या खडकी येथील बॉईज हॉस्टेलमध्ये शाहूराज बिराजदार यांनी कौशल्याची पायाभरणी केली. या जोरावर त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करीत अनेक पदके पटकाविली. यानंतर ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसू लागले. मात्र या सर्वांची एबीसीडी शाहूराज बिराजदार यांनी शिकविली.
बॉक्सिंगमध्ये पदकांची आशा...
लवकरच होणाऱ्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॉक्सर चांगली कामगिरी करतील, यात शंका नाही. भारताला बॉक्सिंगमधून अनेक पदके मिळतील. यासह या स्पर्धेत माझे दोन शिष्य भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून कामगिरी बजावत आहेत, याचा सार्थ अभिमान आहे.
- शाहूराज बिराजदार, माजी ऑलिम्पियाड
सेऊल ऑलिम्पिकमध्ये एका हाताने लढले...
१९८८ साली सेऊल येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत शाहूराज बिराजदार यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते. प्रीक्वाटर सामन्यात प्रतिस्पर्धी बॉक्सरच्या हल्ल्याने डाव्या हाताला इजा पोहोचली. स्नायू तुटल्याने त्यांनी एका हाताने झुंज दिली. या सामन्यात ते जखमी झाले नसते, तर भारताला पदक मिळाले असते, असे बॉक्सिंग खेळातील जाणकार सांगतात.