राष्ट्रीय ॲक्वाथॉन स्पर्धेत लातूरच्या श्रावणीची चमक
By राजकुमार जोंधळे | Updated: June 17, 2024 20:09 IST2024-06-17T20:09:13+5:302024-06-17T20:09:26+5:30
राष्ट्रीयस्तरावर लातूरची पहिली पदकविजेता खेळाडू

राष्ट्रीय ॲक्वाथॉन स्पर्धेत लातूरच्या श्रावणीची चमक
महेश पाळणे / लातूर : राज्य स्पर्धेत पदकांचा डबल धमाका केलेल्या लातूरच्या श्रावणी राजेंद्र जगताप हिने राष्ट्रीय स्पर्धेतही आपली पदकांची लय कायम ठेवत राज्याच्या संघाकडून खेळताना रौप्यपदक प्राप्त केले. त्यामुळे ॲक्वाथॉन खेळात राष्ट्रीयस्तरावर लातूरला पदक मिळवून देणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.
तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय ॲक्वाथॉन स्पर्धेत लातूरच्या श्रावणी जगतापने आपल्या कामगिरीच्या जोरावर रौप्यपदक पटकाविले. ज्युनिअर गटात तिने ही चमक दाखविली आहे. यात देशभरातील विविध राज्यांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. अवघ्या २४.७ मिनिटाच्या कालावधीत तिने जलतरण आणि सायकलिंग करत रौप्यपदकावर आपले नाव कोरले. प्रशिक्षक नीळकंठ हेंबाडे, राहुल होनसांगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
राज्य स्पर्धेत पदकांचा होता डबल धमाका..
गत महिन्यात पुण्यातील बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने ट्रायथलॉंन प्रकारात सुवर्णपदक पटकाविले होते, तर ॲक्वाथॉन प्रकारात रौप्यपदक पटकावत दुहेरी धमाका केला होता. या जोरावरच तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती.
२५ सेकंदाने हुकले सुवर्णपदक...
या राष्ट्रीय स्पर्धेत श्रावणीने २४.७ मिनिटांचा वेळ घेत जलतरण व रनिंग करत रौप्यपदक पटकाविले. प्रथम आलेल्या खेळाडूचा वेळ हा २३.४२ मिनिटे होता, त्यामुळे तिचे सुवर्णपदक अवघ्या २५ सेकंदांनी हुकले.
स्विमिंगची भरपाई केली रनिंगमध्ये..
या खेळात लगातार स्विमिंग व रनिंग केली जाते. ४५० मीटर स्विमिंग व ३.७५ कि.मी. रनिंग असा या खेळाचा उद्देश असतो. या स्पर्धेत ती स्विमिंग प्रकारात सहाव्या स्थानी होती, मात्र तिने रनिंग मध्ये तो टायमिंग कव्हर करत देशभरात दुसरे स्थान पटकाविले.
भारताकडून खेळण्याचे स्वप्न...
राष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळाल्याचा आनंद आहे, विशेषत: लातूरसाठी या खेळात राष्ट्रीयस्तरावर माझ्या रूपाने पदक आले. माझ्यासाठी गौरवाची बाब आहे. गतवर्षी आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी चेन्नई येथे निवड चाचणी झाली होती. त्यात माझा पाचवा क्रम होता. या पदकाने आत्मविश्वास वाढला असून, अबुधाबी येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी मी तयारी करणार आहे.
- श्रावणी जगताप