जळकोट (जि. लातूर) : कापूस वेचणीसाठी तिरुरू नदीपात्रातील पुलावरून शेताकडे निघालेल्या कौशल्याबाई अजय वाघमारे (३५) व रुक्मिणी अजय वाघमारे (१२, रा. मरसांगवी, ता. जळकोट) या माय-लेकीचा पाण्याचा प्रवाह वाढल्याने बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सोमवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास मरसांगवी येथे घडली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथील अजय वाघमारे हे शेतमजूर आहेत. ते उदरनिर्वाहासाठी आपल्या कुटुंबासह हाताला मिळेल ती कामे करतात. सोमवारी सकाळी कौशल्याबाई अजय वाघमारे व त्यांची मुलगी रुक्मिणी या दोघी गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातील कापूस वेचणीसाठी निघाल्या होत्या. या दोघी तिरू नदीपात्रातील जुन्या पुलावरून जात असताना अचानकपणे नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला आणि काही क्षणात त्या वाहून जाऊन लागल्या. हे पाहून गावातील नागरिकांनी धाव घेतली आणि त्यांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, तत्पूर्वी त्या दोघींचा मृत्यू झाला.
कुटुंबाचा आधार हरवलाशेतमजूर अजय वाघमारे यांच्या कुटुंबांत पत्नी कौशल्याबाई, मुलगी रुक्मिणी आणि दोन मुले आहेत. सोमवारी सकाळी रोजंदारीसाठी शेताकडे निघालेल्या कौशल्याबाई आणि मुलगी रुक्मिणी यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. त्यामुळे अजय वाघमारे यांच्या कुटुंबाचा आधारच हरवला आहे.
गावावर शोककळामरसांगवी येथील माय-लेकीचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे समजताच नागरिकांनी तिरू नदीपात्राकडे धाव घेतली. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. आई आणि बहिणीचा मृतदेह पाहून मुले आक्रोश करीत होती.
रुक्मिणीताई ६ वीच्या वर्गातमयत रुक्मिणी ही गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकत होती. दीपावलीनंतर सोमवारी शाळेचा पहिला दिवस होता. मात्र, आईसोबत कामाला जाऊन यावे म्हणून ती शेताकडे निघाली होती, असे नातेवाइकांनी सांगितले.
अचानक पाणी पातळी कशी वाढली?सध्या पाऊस नाही. त्यामुळे तिरू नदीपात्रातील पाणी पातळीत सोमवारी सकाळी अचानक कशी काय वाढ झाली, असा सवाल व्यक्त होत असताना सुल्लाळी येथील बॅरेजेसमधून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याचे सांगण्यात येत होते. दरम्यान, बॅरेजेसच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो होऊ शकला नाही.
जुन्या पुलामुळे आपत्तीतिरू नदीपात्रातून मरसांगवीस ये-जा करण्यासाठी जुना पूल आहे. त्या पुलावरून पाणी वाहत आहे. अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे ही घटना घडली. विशेषत: याच ठिकाणी एका मुलाचाही काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.
उपविभागीय अधिकाऱ्यांनी केले कुटुंबियांचे सांत्वनया घटनेची माहिती मिळताच माजी मंत्री आ. संजय बनसोडे, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी तात्काळ उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राजेश लांडगे यांना सूचना केल्या. उपविभागीय अधिकारी शिंदे व तहसीलदार लांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले. दरम्यान, वाघमारे कुटुंबास शासन नियमाप्रमाणे सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी सांगितले.
Web Summary : In Latur, a mother and daughter drowned after a sudden water release from a dam. They were crossing a bridge on the Tiru River for work when the surge occurred. The incident has cast a pall of gloom over the village.
Web Summary : लातूर में, बांध से अचानक पानी छोड़े जाने के बाद एक माँ और बेटी डूब गईं। वे काम के लिए तिरु नदी पर एक पुल पार कर रही थीं, तभी पानी का बहाव बढ़ गया। इस घटना से पूरे गाँव में शोक की लहर दौड़ गई है।