Latur: NEET परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडील म्हणाले, अभ्यासाचे कारण वाटत नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 15:43 IST2025-05-05T15:42:46+5:302025-05-05T15:43:31+5:30
दहावीला ९२.५ टक्के गुण हाेते. बारावीला ८४ टक्के गुणे हाेते.

Latur: NEET परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्याने संपवले जीवन; वडील म्हणाले, अभ्यासाचे कारण वाटत नाही
लातूर : बीड जिल्ह्यातील रुई-धानाेरा (ता. गेवराई) येथील अनिकेत अंकुश कानगुडे (वय २०) या विद्यार्थ्याने राहत्या खाेलीत गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना लातुरात २ मे राेजी दुपारी घडली. असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. पाेलिसांनी अद्याप कुटुंबीयांचा जबाब घेतला नाही, तर वडिलांनी नीट वा अभ्यासामुळे ताे टाेकाचे पाऊल उचलेल असे वाटत नसल्याचे स्पष्ट केले आहे.
पाेलिसांनी सांगितले, रुई (धानोरा) येथील अनिकेत कानगुडे हा काही महिन्यांपासून लातुरात बाेधेनगर येथे भाड्याच्या खाेलीत राहत हाेता. शुक्रवारी सकाळी १० वाजता शेजारचे मित्र बाहेर गेले हाेते. ताे खाेलीवर एकटाच हाेता. दुपारी ३ वाजता मित्राने खाेलीचा दरवाजा वाजविला. बराच वेळ झाले तरी दार उघडत नसल्याने त्याने शेजाऱ्याला माहिती दिली. दार जाेराने ढकलल्यानंतर अनिकेतने छताला गळफास घेतल्याचे आढळले. शनिवारी सकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
दाेन दिवसांपासून एकटाच हाेता
त्याच्या खाेलीवर राहणाऱ्या मित्राचे नीटचे केंद्र नांदेड आल्याने दाेन दिवसांपूर्वीच त्याने खाेली साेडली हाेती. अनिकेत एकटाच राहत हाेता. शेजारी राहणाऱ्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, ताे फारसे बाेलत नव्हता.
जबाबानंतरच कारण समाेर येईल
आम्ही त्याच्याशी माेबाइलवर बाेलत हाेताे. त्याच्यावर अभ्यासाचा ताण असावा, असे कधीही वाटले नाही. ताे बाेलताना कुठल्याही दडपणाशिवाय बाेलत हाेता. त्याला दहावीला ९२.५ टक्के गुण हाेते. बारावीला ८४ टक्के गुणे हाेते. नीटच्या अभ्यासामुळे त्याने असे पाऊल उचलले असे वाटत नसल्याचे वडील अंकुश कानगुडे यांनी सांगितले, तर पाेलिस निरीक्षक दिलीप सागर म्हणाले, कुटुंबीयांचा जबाब घेतल्यानंतर कारण समाेर येऊ शकेल.