शाळकरी मुलाचा खून करणाऱ्यास मुंबईतून अटक; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी
By हरी मोकाशे | Updated: June 23, 2024 17:06 IST2024-06-23T17:06:35+5:302024-06-23T17:06:41+5:30
मुलाचा खून झाल्यापासून आरोपी योगेश केंद्रे हा गावातून गायब झाला होता.

शाळकरी मुलाचा खून करणाऱ्यास मुंबईतून अटक; न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलिस कोठडी
लातूर : अहमदपूर तालुक्यातील येलदरवाडी येथील एका १३ वर्षीय भोळसर व मूकबधीर शाळकरी मुलाचा खून झाल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली होती. याप्रकरणातील आरोपीस पोलिसांनी शनिवारी मुंबईतून अटक केली. त्यास अहमदपूर येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
रुकेश ऊर्फ गोटू गोविंद गित्ते (१३) असे मयताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, येलदरवाडी येथील मयत रुकेश ऊर्फ गोटू गोविंद गित्ते हा भोळसर, मूकबधीर मुलगा अहमदपुरातील मूकबधीर विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत होता. तो बुधवारी गावातून गायब झाला होता. नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता गुरुवारी सकाळी गावाशेजारी असलेल्या शेतातील झाडा- झुडुपाच्या ओढ्यात त्याचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी ज्ञानोबा गित्ते यांच्या फिर्यादीवरुन योगेश तुकाराम केंद्रे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, मुलाचा खून झाल्यापासून आरोपी योगेश केंद्रे हा गावातून गायब झाला होता. त्याने मुलाचे खून करून गावातील एक किराणा दुकान फोडून २८० रुपये घेऊन मुंबईला पसार झाल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन किनगाव पोलिसांनी नेरूळ मुंबई पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची माहिती दिली. नेरूळ पोलिसांनी त्यास अटक केली. तद्नंतर किनगाव पोलिसांचे पथक मुंबईत जाऊन आरोपीस ताब्यात घेतले. शनिवारी अहमदपूर येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती सपोनि भाऊसाहेब खंदारे यांनी दिली.