जळकोट (जि. लातूर) : भाच्याच्या विवाहासाठी निघालेल्या ७० वर्षीय महिलेस मळमळ होऊ लागल्याने त्या डिग्रस (ता. कंधार) येथे रस्त्याच्या बाजूस थांबल्या होत्या. तेव्हा भरधाव वेगातील एका कारचालकाने त्यांना जोराची धडक दिली आणि फरफटत तब्बल २० किलोमीटर असलेल्या पाटोदा बु. (ता. जळकोट) येथे आणल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जळकोट पोलिसांत कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिमाबाई विठ्ठलराव बाचीपळे (७०, रा. घाटबोरळ, ता. हुमनाबाद, जि. बीदर), असे मयत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले, कर्नाटकातील घाटबोरळ येथील चिमाबाई बाचीपळे या भाच्याच्या विवाहासाठी एसटी बसने निघाल्या होत्या. त्यांच्यासोबत मुलगा तानाजी बाचीपळे होता. हे दोघे डिग्रस (ता. कंधार) येथे उतरले. तेव्हा चिमाबाई यांना मळमळ होऊ लागल्याने त्या रस्त्याच्या बाजूस थांबल्या होत्या.
दरम्यान, नांदेडहून भरधाव वेगात आलेल्या कार (एमएच ०३ एझेड ८६७१)ने त्यांना जोराची धडक दिली. त्यात त्यांची साडी कारला अडकली आणि वाहनासोबत त्या फरफरटू लागल्या. जळकोट तालुक्यातील पाटोदा बु. येथे कारचा वेग कमी झाल्याने आणि साडीचे तुकडे झाल्याने त्या रस्त्याच्या बाजूस पडल्या. याप्रकरणी त्यांचा मुलगा तानाजी बाचीपळे यांच्या फिर्यादीवरून जळकोट पोलिस ठाण्यात रविवारी दुपारी अज्ञात कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक हारणे हे करीत आहेत.
मृतदेहाच्या चिंधड्या-चिंधड्याडिग्रस ते पाटोदा बु. हे जवळपास २० किलोमीटरचे अंतर आहे. अपघातात कारला मयत चिमाबाई बाचीपळे यांची साडी अडकल्याने त्या पाटोदा बु.पर्यंत फरफटत आल्या. त्यामुळे हात-पाय तुटले होते तर शरीराच्या अक्षरश: चिंधड्या-चिंधड्या झाल्या होत्या. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
डोळ्यांदेखत आईची फरफटउलटीचा त्रास होऊ लागल्याने आम्ही रस्त्याच्या बाजूला थांबलो होतो. तेव्हा नांदेडकडून आलेल्या कारने आईला धडक दिली. काही समजण्याच्या आत वाहनासोबत ती फरफटत होती. भरधाव वेगातील कार थांबत नव्हती. मी मिळेल त्या वाहनाने पाठलाग केला. तोपर्यंत आई मरण पावली होती तर कार वाऱ्याच्या वेगाने निघून गेल्याचे मुलगा तानाजी बाचीपळे यांनी सांगितल्याचे पोलिस म्हणाले.
थरकाप उडविणारी घटनाअपघातातील मयत महिला वाहनामुळे फरफटत आल्याने कपड्याच्याच नव्हे तर शरीराच्याही चिंधड्या झाल्या होत्या. पाटोदा बु. येथे वेग कमी झाल्याने त्या रस्त्याच्या बाजूस पडल्या होत्या.- सचिन चव्हाण, पोलिस निरीक्षक, जळकोट