किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच अन् कर्मचार्यांत वाद वाढला!
By हरी मोकाशे | Updated: June 15, 2024 18:01 IST2024-06-15T18:01:02+5:302024-06-15T18:01:13+5:30
ग्रामसभेतून नवीन कर्मचार्यांची भरती करणार

किल्लारी ग्रामपंचायतीचे सरपंच अन् कर्मचार्यांत वाद वाढला!
लातूर : किल्लारी ग्रामपंचायत डिजिटल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना अडचण होत आहे. त्यातूनच कार्यवाहीच्या भीतीपोटी कर्मचारी शुक्रवारपासून अचानक संपावर गेले आहेत. दरम्यान, नागरिकांची कागदपत्रांसाठी गैरसोय होऊ नये म्हणून पंचासमक्ष कार्यालय उघडून ग्रामविकास अधिकार्यांनी दिवसभर आवश्यक प्रमाणपत्रांचे वितरण केल्याची माहिती सरपंच सुलक्षणा बाबळसुरे यांनी दिली.
औसा तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत किल्लारीची आहे. ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक करण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्याची कर्मचार्यांना अडचण होत आहे. त्यामुळे ते विरोध दर्शवित आहेत. त्यामुळे काहींना नोटीस देण्यात आली आहे. कर वसुली होत नसल्याने कर्मचारी कमी करण्यासंदर्भात विशेष मासिक बैठक होणार होती, असे सरपंचांनी सांगितले.
ग्रामपंचायतीच्या काही कर्मचाऱ्यांनी धनादेशाद्वारे अनामत रक्कम यापूर्वीच उचलली आहे. ती रक्कम कर्मचाऱ्यांना कशी दिली, हे गुलदस्त्यात आहे. गावात फिरून जे कर्मचारी काम करतात, त्यांना इंधन खर्च दिला जातो. त्यांनीही कामावर आल्यानंतर आणि जाताना ऑनलाइन पंच करणे आवश्यक आहे. शिवाय, डिजिटलमुळे कर्मचारी नेमके कोठे आहेत, याची माहिती समजणार आहे. ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे नागरिकांतून स्वागत होत असले तरी कर्मचारी जुन्या पद्धतीने काम करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यातून कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचे सरपंच सुलक्षणा बाबळसुरे, सुमन भोसले, वैशाली गुंजोटे, बबिता कांबळे आदींनी सांगितले. यावेळी श्रीकांत कोणे, पंडितअण्णा गावकरे, डॉ. हरिश्चंद्र कांबळे, किशोर बिराजदार, उमाटे आदींची उपस्थिती होती.
ग्रामपंचायत डिजिटल...
कर क्यूआर कोड व स्कॅनरने स्वीकारण्यावर भर आहे. कर व इतर रक्कम भरणाऱ्यांना त्या रकमेचा मोबाइलवर एसएमएस मिळणार आहे. सीसीटीव्हीमुळे मासिक बैठका, ग्रामसभेचे थेट प्रक्षेपण होणार आहे. कर्मचाऱ्यांना नेमून दिलेली कामे ग्रामस्थांना मोबाइलवर पाहता येणार.
बीडीओंच्या निर्णयाकडे लक्ष...
गटविकास अधिकाऱ्यांनी निर्णय दिल्याशिवाय आम्ही कामावर येणार नाही, असे संपावर गेलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सांगितले.