लातूर - मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी वाजवल्यास होणार कारवाई
By राजकुमार जोंधळे | Updated: September 8, 2022 22:48 IST2022-09-08T22:48:03+5:302022-09-08T22:48:21+5:30
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी वाजवल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार असल्याची पोलीस अधीक्षकांची माहिती.

लातूर - मिरवणुकीत आक्षेपार्ह गाणी वाजवल्यास होणार कारवाई
लातूर : शुक्रवारी काढण्यात येणाऱ्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत समाजात तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह गाणी वाजवल्यास थेट गुन्हे दाखल केले जाणार आहेत. असा इशारा लातूर येथील अग्रवाल सभागृहात झालेल्या मिरवणूकपूर्व तयारी बैठकीत जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी दिला आहे.
श्री गणेश मूर्ती विसर्जन मिरवणूक निर्विघ्नपणे आणि उत्साहाच्या वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस आणि स्थानिक नागरिकांची बैठक गुरुवारी सायंकाळी पार पडली. शुक्रवारी सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीबाबत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, यासाठी पोलीस अधिकारी, अंमलदार त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून, पोलीस प्रशिक्षण केंद्रातून आलेल्या पोलिसांना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष सूचना केल्या. यात बंदोबस्तावर असणारे अधिकारी, अंमलदार यांचे काय कर्तव्य आहेत? त्यांचे अधिकार काय आहेत? याबाबत चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये लातूर शहरातील पोलीस अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने हजर होते.
आक्षेपार्ह गाणी वाजवू नका...
गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान साऊंड सिस्टिमवर वाजविण्यात येणाऱ्या गाण्याबद्दल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 (2) अन्वये मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करून सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह गाणी वाजविणे, त्या गाण्याची सीडी, कॅसेट सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करणे, ताब्यात ठेवणे यावर गणेशोत्सव काळात बंदी घातली आहे. समाजात तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह गाणी वाजविल्यास कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.