लातूर : रेल्वेच्या उड्डाणपुलावर अपघात, दीड तास वाहतूक ठप्प; तिघेजण जखमी
By आशपाक पठाण | Updated: May 2, 2023 23:59 IST2023-05-02T23:57:16+5:302023-05-02T23:59:09+5:30
हरगुंळ बु. नजीक बार्शी रोडवरील घटना.

लातूर : रेल्वेच्या उड्डाणपुलावर अपघात, दीड तास वाहतूक ठप्प; तिघेजण जखमी
लातूर : बार्शी रोडवरील हरंगुळ बु. नजीक असलेल्या रेल्वे उड्डाणपुलावर हायवा, छोटा हत्ती व ऑटोचा अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत तिघेजण जखमी झाले आहेत. तब्बल एक तास वाहतूक विस्कळीत झाल्याने अनेक वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.
हायवा ट्रक लातूरहून बारा नंबरकडे जात होता. समोरून आलेल्या छोटा हत्ती व हायवाचा अपघात झाला. यात पाठीमागून आलेल्या ऑटोला जोराचा धक्का बसल्याने ऑटोतील दोघेजण जखमी झाले आहेत. रेल्वेच्या उड्डाणपुलावर अपघात झाल्याने वाहने बाजूला सारण्यासाठी जवळपास एक तास कोणीही प्रयत्न केले नसल्याने वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांना जाण्यासाठी मार्ग नसल्याने अनेकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब केला.
एमआयडीसी पोलीस ठाण्यापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावर घटना घडलेली असतानाही रात्री ११.३० वाजेपर्यंत अपघातग्रस्त वाहने जागेवर होती. परिणामी वाहतुकीची कोंडी झाली. यासंदर्भात एमआयडी पोलीस ठाण्याचे सपोनि. गोरख दिवे म्हणाले, बार्शी रोडवर अपघात झाला आहे. काही वेळ वाहतूक कोेंडी झाली. घटनास्थळी पोलीस अधीक्षक कार्यालयातील चार्ली व एमआयडीसी पोलीस ठाण्यातील बीट अंमलदार गेले आहेत.