Latur: देवणीत हिंस्र प्राण्याचा थरार! हल्ल्यात सहा जण जखमी, सर्वांच्या डोळे-डोक्याला इजा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 17:14 IST2025-11-01T17:14:03+5:302025-11-01T17:14:52+5:30
सर्वांच्याच डोळ्याला व डोक्याला इजा झाली असून, त्यांना उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

Latur: देवणीत हिंस्र प्राण्याचा थरार! हल्ल्यात सहा जण जखमी, सर्वांच्या डोळे-डोक्याला इजा
- रमेश कोतवाल
देवणी (जि. लातूर) : लातूर जिल्ह्यातील देवणी व परिसरात शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास एका हिंस्र प्राण्याने पाच ते सहा जणांवर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. सर्वांच्याच डोळ्याला व डोक्याला इजा झाली असून, त्यांना उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
देवणी येथील पंचायत समिती परिसरात या हिंस्र प्राण्याने युनूस सरदारमियां मिर्झा (५५) यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर इनाया इस्माईल मल्लेवाले या तीन वर्षांच्या मुलीवर हल्ला केला. तेथून हा प्राणी देव नदीच्या किनारी फिरत असताना फैजान फिरोज येरवळे (९ वर्षे) या मुलावर हल्ला करून त्याला जखमी केले. त्यानंतर हा प्राणी देव नदीच्या पलीकडे शेतावर गेला. तेथे चन्नाप्पा राजाप्पा भदशेट्टे (वय ५५) यांना जबर जखमी केले. पुढे मार्गस्थ होत असताना हा प्राणी कोतवाल यांच्या शेतीजवळ आला. तेथे गोविंदराव माणिकराव म्हेत्रे यांच्यावर हल्ला केला. तेथून हा प्राणी उत्तर दिशेला शेतशिवारात निघून गेला. दरम्यान, सहा लोकांना हिंस्र प्राण्याने जखमी केले. एकाचे नाव समजले नाही.
हिंस्र प्राण्याबाबत संभ्रम; तरस असल्याची शक्यता
हा हिंस्र प्राणी लांडगा की कोल्हा, असा सुरुवातीला समज निर्माण झाला होता. मात्र याचवेळी उमरगा तालुक्यातील वाहतूकदार कामानिमित्त देवणी येथे आले असता त्यांना या घटनेची माहिती मिळाली. त्यांनी हा प्राणी तरस असावा अशी शक्यता वर्तविली. त्यांच्या म्हणण्यानुसार केरळ राज्यातून हा प्राणी उमरगा तालुक्यात आणून सोडला, तेथेही असाच धुमाकूळ या प्राण्याने केला असल्याचे सांगण्यात आले.
काही दिवसांपूर्वी दिसल्याची चर्चा
या घटनेमुळे देवणी शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्राण्याबद्दल अनेक प्रकारची माहिती समोर येत आहे. येथील डॉ. संजय अटर्गेकर यांनी १५ दिवसांपूर्वी निलंगा-उदगीर या राज्य रस्त्यावर अजनी पाटीजवळ रात्री ९ वाजेच्या सुमारास या प्रकारचे प्राणी आढळल्याचे सांगितले. पंधरा दिवसांत दोनदा असे प्राणी आढळले असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, वनविभागाने या घटनेची तातडीने दखल घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी देवणी परिसरातील नागरिकांनी केली.
वन विभागाची देवणी परिसरात गस्त
देवणी परिसरामध्ये वनविभाग आणि पोलिसांकडून गस्त सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी भयभीत होण्याचे कारण नाही. वनविभागाशी संपर्क करावा. हल्ला केलेला हिंस्र प्राणी तरस किंवा अन्य कुठला आहे, याबाबत कळणे शक्य नाही. जे छायाचित्र प्राप्त झाले आहे, त्यावरूनही ते कळत नाही. आता वनविभागाची सहा लोकांची टीम लातूरहून देवणी परिसरात आलेली आहे. ज्या दिशेने तो प्राणी गेला आहे त्या दिशेनेही वनविभाग लक्ष ठेवून आहे, अशी माहिती देवणी तालुक्याचे वनरक्षक एस. आर. घोगरे यांनी दिली.