नवीन वसाहत परिसरात सुविधांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:17 IST2021-04-19T04:17:40+5:302021-04-19T04:17:40+5:30
पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी बसविल्या येळण्या लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पशु, पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, ...

नवीन वसाहत परिसरात सुविधांचा अभाव
पक्ष्यांसाठी विविध ठिकाणी बसविल्या येळण्या
लातूर : शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून, पशु, पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी सामाजिक संस्थांच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात विविध ठिकाणी येळण्या बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे. प्रत्येकाने आपल्या घराच्या टेरेसवर पक्ष्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करावे, असे आवाहन पक्षीमित्रांच्या वतीने करण्यात आले आहे.
स्कूलबस चालकांना आर्थिक मदत करावी
लातूर : कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसचालकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या बसेस उभ्या असून, बँकांकडून हप्ता भरण्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे राज्य शासनाने स्कूल बसचालकांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे.
थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली
लातूर : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, वाढत्या उन्हामुळे उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिकांनी घरात कुलरचा आधार घेतला आहे. वाढत असलेल्या तापमानामुळे थंड पाण्याच्या जारला मागणी वाढली आहे. अनेक जार सेंटरच्या वतीने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागात सकाळच्या वेळी घरपोच सेवा दिली जात आहे. त्यामुळे जारच्या दरात वाढ झाली असल्याचे लातूर शहरातील चित्र आहे.
कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी पालकांची लगबग
लातूर : राज्य शासनाच्या वतीने आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. जिल्ह्यात २३८ शाळांनी नोंदणी केली होती. राज्यस्तरावर सोडतीत १६०४ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. संदेश प्राप्त झाल्यानंतर प्रवेश प्रक्रियेला गती मिळणार आहे. त्यामुळे प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पालकांची लगबग दिसून येत आहे. यंदा तालुकास्तरावर पडताळणी समितीकडून कागदपत्रे तपासून घ्यावी लागणार असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
लातूर : शहरानजीक असलेल्या आर्वी, हरंगूळ नवीन वसाहतीमध्ये वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. नियमित वीजबिल भरूनही वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात आहे. महावितरणचा संपर्क क्रमांकही बंद असल्याने गैरसोय होत आहे. वीज पुरवठा सुरळीत करावा, यासाठी महावितरण कार्यालयालाही निवेदन देण्यात आले आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असून, महावितरणने वीज पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर आरोग्य विभागाचा भर
लातूर : शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत आहे. त्यामुळे बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तिंचा आरोग्य विभागाच्या वतीने शोध घेऊन तपासणी केली जात आहे. शहरात महानगरपालिका आणि ग्रामीण भागात आरोग्य विभागाच्या वतीने कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर दिला जात आहे. यासोबतच सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना होमआयसोलेशनचा पर्याय देण्यात येत असून, होमआयसोलेशनमधील रुग्णांशी दररोज संपर्क साधून आरोग्याची विचारणा केली जात आहे. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, मास्क, फिजिकल डिस्टन्स आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
रेणापूर नाका परिसरात रस्त्याच्या कडेला कचरा
लातूर : रेणापूर नाका ते पाच नंबर चौकापर्यंत सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ असते. अनेकजण या रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून, वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. सदरील कचरा नियमित उचलला जात नसल्याने वाऱ्यामुळे हा कचरा रस्त्यावर येत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांमधून होत आहे.