देवणी तालुक्यात कोविड लसींचा साठा संपुष्टात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:19 IST2021-04-18T04:19:25+5:302021-04-18T04:19:25+5:30

देवणी : आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर दिला जात आहे. तालुक्यात आतापर्यंत जवळपास पाच हजार जणांनी कोविड लस घेतली ...

Kovid vaccine stocks depleted in Devani taluka! | देवणी तालुक्यात कोविड लसींचा साठा संपुष्टात !

देवणी तालुक्यात कोविड लसींचा साठा संपुष्टात !

देवणी : आरोग्य विभागाकडून कोविड लसीकरणावर भर दिला जात आहे. तालुक्यात आतापर्यंत जवळपास पाच हजार जणांनी कोविड लस घेतली आहे. दरम्यान, लसींचा साठा संपुष्टात आल्याने लसीकरणाचे काम थांबल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासनाने तालुका आरोग्य विभागास लसींचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांतून करण्यात येत आहे.

देवणी तालुक्यात २५ जानेवारीपासून कोविड लसीकरणास सुरुवात झाली. प्रारंभी शासनाच्या अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना लस देण्यास सुरुवात झाली. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना आणि विविध आजार असलेल्यांना लसीकरण करण्यास सुरुवात झाली. येथील ग्रामीण रुग्णालय, वलांडी आणि बोरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच काही आरोग्य उपकेंद्रात लसीकरणास प्रारंभ झाला. दरम्यान, नागरिकांत जनजागृती झाल्याने लसीकरणास वेग आला आहे.

देवणी शहरात आतापर्यंत जवळपास अडीच हजार तसेच तालुक्यात अडीच हजार असे एकूण जवळपास पाच हजार नागरिकांनी लस घेतली आहे. दोन दिवसांपासून बाेरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र वगळता अन्य ठिकाणी लस नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे. बोरोळ केंद्रात केवळ २० लसी उपलब्ध आहेत.

लसींची लागली प्रतीक्षा...

तालुक्यातील लसींची गरज पाहता, जिल्हा प्रशासनाकडे लसींचा पुरवठा करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. लसींचा साठा संपुष्टात आल्याने लसीकरणाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे.

पुरवठा होताच लसीकरण...

देवणी, वलांडी, बोरोळ, लासोना, सावरगाव, दवणहिप्परगा, कोनाळी, आदी केंद्रांवर जवळपास पाच हजार नागरिकांनी कोविड लस घेतली आहे. तालुक्यास आवश्यक असलेल्या लसींची मागणी करण्यात आली आहे. लस उपलब्ध होताच पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येईल, अशी माहिती तालुका आरोग्याधिकारी डॉ. दिलीप गुरमे यांनी दिली.

कोविडसाठी २० खाटा...

कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने येथील ग्रामीण रुग्णालयात कोविडसाठी १० ऐवजी २० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. नीळकंठ सगर यांनी दिली.

Web Title: Kovid vaccine stocks depleted in Devani taluka!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.