पावसामुळे निलंग्यातील रस्त्यावर गुडघाभर पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:17 IST2021-05-30T04:17:25+5:302021-05-30T04:17:25+5:30
निलंगा शहरात सतत अवकाळी पाऊस होत आहे. परिणामी, खरीप हंगामपूर्व शेती कामे खोळंबत आहेत. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती ...

पावसामुळे निलंग्यातील रस्त्यावर गुडघाभर पाणी
निलंगा शहरात सतत अवकाळी पाऊस होत आहे. परिणामी, खरीप हंगामपूर्व शेती कामे खोळंबत आहेत. या भागातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली नाही. दरम्यान, शहरात पालिकेने नवीन जलवाहिनीसाठी रस्ते खोदकाम केले आहे. अवकाळी पावसामुळे चिखल होत असून नाली आणि पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे. परिणामी, दुर्गंधी पसरत आहे. जलवाहिनीची कामे पावसाळ्यापूर्वी होऊन रस्त्याची कामे झाली असती तर नागरिकांना दिलासा मिळाला असता.
शहरातील बँक कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. थोडाही पाऊस झाला की पादचाऱ्यांसह वाहनधारकांना ये-जा करणे कठीण होत आहे. पालिकेने तात्काळ रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी होत आहे. बँक कॉलनीत एक महाविद्यालय आणि चार शाळा आहेत. तसेच बाजार समिती, एमआयडीसीमुळे अवजड वाहतूक या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर होत असते. रस्ता दुरवस्था आणि पावसामुळे पाणी साचल्याने वाहनधारकांना त्रास होत आहे.
लॉकडाऊनमुळे गती मंदावली...
लॉकडाऊनमुळे कामाची गती मंदावली आहे. काही दिवस काम बंद राहिल्याने कामास थोडासा विलंब झाला, असे पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांनी सांगितले. जलयोजना ही कायमस्वरूपी असून भविष्यात पाण्याचा कायमचा त्रास कमी होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी थोडासा त्रास सहन करावा, असे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले.