अहमदपूर तालुक्यात ७० हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:30+5:302021-05-28T04:15:30+5:30
अहमदपूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, अहमदपूर तालुक्यात ७० हजार ६६७ हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन ...

अहमदपूर तालुक्यात ७० हजार हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा
अहमदपूर : खरीप हंगाम काही दिवसांवर येऊन ठेपला असून, अहमदपूर तालुक्यात ७० हजार ६६७ हेक्टरवर पेरणी करण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी कृषी विभागाच्या वतीने बियाणे व खतांचे नियोजन करण्यात आले असून, सर्वाधिक ३९ हजार २०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
पेरा होणाऱ्या पिकांमध्ये कारळ ४० हेक्टर, तीळ १५२, गळीत धान्यामध्ये ३९ हजार ४४७, इतर ३५ हेक्टर, नगदी पिकांमध्ये ऊस ७ हजार ३०० हेक्टर, कापूस ७ हजार १५२, ज्वारी ३ हजार ६०, बाजरी ९१, मका ४२५, तूर १२ हजार ५८४, मूग ४६५, उडीदाची ४५७ हेक्टरवर पेरणी होणार आहे. तालुक्याचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र ७० हजार ६६७ हेक्टर असून, त्यापैकी सोयाबीन ३९ हजार २०० हेक्टर, तूर १२ हजार ५८४ हेक्टर, ज्वारी ३ हजार ६० हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज आहे. यावर्षी सोयाबीन पिकाच्या क्षेत्रात वाढ झाली असून, ३९ हजार २०० हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार आहे. खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीन बीजोत्पादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यावर्षी तूर पिकाची १२ हजार ५८४ हेक्टरवर पेरणी होणार आहे. तसेच ७ हजार १५२ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात येणार आहे. माती परीक्षणावर आधारित पिकांना रासायनिक खतांची मात्रा देण्यात येणार असून, युरिया खताचा वापर दहा टक्के कमी करण्यात येणार आहे. सोयाबीन आणि मूग पिकाची उगवण क्षमता चाचणी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवून करण्यात येणार आहे. बीज प्रक्रियेवर भर देण्यात येणार आहे. तसेच रुंद सरी वरंबा पद्धतीने सोयाबीन, मूग, तूर व भुईमूग पिकाची लागवड करण्यात येणार असल्याचे तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी सांगितले.
शेतकऱ्यांसाठी ३५ शेतीशाळा घेणार...
तालुका कृषी विभागाच्या वतीने यावर्षीच्या खरीप हंगामात विविध पिकांच्या ३५ शेतकरी शेती शाळा घेण्यात येणार आहेत. यामध्ये विशेष म्हणजे महिला शेतकऱ्यांसाठी १२ शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन घरचेच बियाणे पेरावे. सोयाबीन उगवण क्षमता प्रात्यक्षिके करून दाखवण्यात येत असून, बीज प्रक्रिया मोहीम तालुक्यात राबविणे चालू आहे.
रासायनिक खते आणि बियाण्यांचे नियोजन...
खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असला तरी बियाणी, रासायनिक खते बाजारात अत्यल्प प्रमाणात उपलब्ध आहेत. हवे असलेले सोयाबीन बियाणे मिळत नाही. शेतकऱ्यांची भटकंती सुरू आहे. तूर्तास सोयाबीन बियाणे खरेदीकडे शेतकऱ्यांचे लक्ष असून, अन्य बियाण्याची तूर्तास मागणी होत नसल्याने कृषी सेवा केंद्रांवरदेखील दरवर्षी होणारी गर्दी पाहावयास मिळत नाही. कृषी सेवा केंद्राकडे अन्य बियाण्यांचा पुरेसा साठा सध्या उपलब्ध नसून, ते बियाणे उपलब्धतेच्या प्रतीक्षेत आहेत.
कापूस पिकांसाठी एक गाव एक वाण...
अहमदपूर तालुक्यात एक गाव एक वाणसाठी पाच गावांची निवड करण्यात आले आहे. खंडाळी, उजना, नागझरी, सुमठाणा, टाकळगाव ही गावे एक गाव एक वाणसाठी निवडण्यात आली आहेत. यासाठी सहा गावांमध्ये एक पीक एक वाणाचा प्रसार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. सध्या सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी, जैविक बीजप्रक्रिया, बीबीएफ तंत्रज्ञानाचा अवलंब यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यात येत आहे.
उगवण क्षमता तपासणी करावी...
शेतकरी बांधवांनी येत्या खरीप हंगामासाठी घरचे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता तपासून बीजप्रक्रिया करून पेरावे. तसेच निविष्ठा खरेदी करताना पक्की पावती घ्यावी. कृषी विभागाच्या विविध योजनांसाठी आपल्या गावाच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा. एमआरपीपेक्षा जास्त दराने कोणी दुकानदार विक्री करत असेल तर कृषी अधिकारी पंचायत समिती किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संर्पक करावा. - भुजंग पवार, तालुका कृषी अधिकारी, अहमदपूर
बियाणे पुरवठाही पुरेसा नाही...
सोयाबीनच्या अन्य कंपन्यांकडूनही नोंदणी केलेले बियाणे उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. कंपन्या त्यांच्या सोयीनुसार बियाण्यांचा पुरवठा करीत आहेत. उपलब्ध बियाणे पुरेसे नसून त्याची प्रतीक्षा केली जात आहे. यंदा सोयाबीन लागवडीवर शेतकऱ्यांचा मोठा कल असून, तूर्तास याच बियाण्याची मागणी होत आहे. त्यातच शेतकरी महाबीजच्या बियाण्याला प्रथम पसंती देत असून, त्याचीच मागणी करीत आहेत. त्यामुळे कृषी सेवा केंद्र चालकही हतबल झाले असून, त्याचा व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. - शिवाजीराव पाटील, कृषी सेवा केंद्र चालक, अहमदपूर