अहमदपुरात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:14 IST2021-06-23T04:14:09+5:302021-06-23T04:14:09+5:30
अहमदपूर तालुक्यात पेरणीयोग्य ७१ हजार ९९३ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा सोयाबीनची आतापर्यंत २८ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली असून, ...

अहमदपुरात ७२ टक्के क्षेत्रावर खरिपाची पेरणी
अहमदपूर तालुक्यात पेरणीयोग्य ७१ हजार ९९३ हेक्टर क्षेत्र आहे. यंदा सोयाबीनची आतापर्यंत २८ हजार ९०० हेक्टरवर पेरणी झाली असून, ८ हजार ३७१ हेक्टरवर तूर, ३ हजार ७१४ हेक्टरवर कापसाचा पेरा आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र ६ हजार ८२४ हेक्टर असून, मागील वर्षीपेक्षा यामध्ये वाढ झाली आहे. जूनच्या सुरुवातीला पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे शेतकरी पेरणीच्या कामाला लागले होते. तालुक्यात सरासरी ७२ टक्के पेरणी झाली असून, जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे, त्यांना पावसाची आस लागली आहे. आणखीन काही दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केली नाही, त्यांचे डोळे आभाळाकडे लागले असून, पाऊस पडला तरच वेळेवर पेरणी होणार आहे. उशिरा पाऊस झाल्यास सोयाबीन सोडून इतर पिकांकडे शेतक-यांना वळावे लागणार आहे. आतापर्यंत अहमदपूर मंडळात ७४.५२ टक्के, खंडाळी ८२.३०, अंधोरी ३३.६८, किनगाव ७३.५१, शिरुर ताजबंद ७७.९८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक पाऊस शिरूर ताजबंद मंडळात २७१ मि.मी. झाला असून, अंधोरी मंडळात पावसाच्या अनियमिततेमुळे पेरणीला प्रारंभ झालेला नाही. दरम्यान, जून महिना संपत आला असला, तरी समाधानकारक पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे आभाळाकडे शेतक-यांच्या नजरा लागल्या आहेत.
ओलावा असेल, तरच पेरणी करावी...
शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. त्यासाठी थायरम व जिवाणूसंवर्धकाचा वापर करावा. तसेच सर्वसाधारण जमिनीत ओलावा असेल तरच पेरणी करावी, असे आवाहन प्रभारी तालुका कृषी अधिकारी भुजंग पवार यांनी केले आहे.
मृगाचा पाऊस कमी, पेरण्या खोळंबल्या
अंधोरी व परिसरातील गावात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने जमिनीत ओल झालेली नाही. त्यामुळे केवळ ३३ टक्केच क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. जवळपास ६७ टक्के क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या असून, अंधोरी परिसरातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा असल्याचे शेतकरी संतोष कल्याणी यांनी सांगितले.