कोरोना असेपर्यंतच नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:19 IST2021-03-08T04:19:51+5:302021-03-08T04:19:51+5:30
लातूर : कोविड केअर सेंटरमध्ये डाॅक्टरांसह नर्स, वाॅर्डबाॅय, टेक्निशियन आदी पदांवर कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत आहेत. या कोरोना योद्ध्यांना ...

कोरोना असेपर्यंतच नोकरी
लातूर : कोविड केअर सेंटरमध्ये डाॅक्टरांसह नर्स, वाॅर्डबाॅय, टेक्निशियन आदी पदांवर कंत्राटी कर्मचारी सेवा बजावत आहेत. या कोरोना योद्ध्यांना तीन-तीन महिन्यांची ऑर्डर आहे. कंत्राट संपल्यानंतर गरज असेल तरच पुन्हा सेवेत घेतले जात आहे. यामुळे या कोरोना योद्ध्यांची परवड होत आहे.
लातूर सद्य:स्थितीत तीनशे ते साडेतीनशे कंत्राटी कर्मचारी आहेत. कोरोनाचा संसर्ग थोडा कमी झाल्यानंतर ५० ते ६० जणांची सेवा थांबविण्यात आली होती. आता कोरोनाने डोके वर काढल्याने जिल्ह्यात पुन्हा तीन ठिकाणी बंद केलेले कोविड केअर सेंटर सुरू केले जात आहेत. या कोविड केअर सेंटरवर ज्यांची सेवा थांबविण्यात आली होती, त्यांना पुन्हा कंत्राटी पद्धतीने सेवेत घेण्यात येणार आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून कोविड केअर सेंटरमध्ये कंत्राटी कर्मचारीच योद्धा म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. कायम सेवेत घेण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र शासनाचे निर्देश नसल्याचे त्यांना स्थानिक पातळीवरून कारण दिले जात आहे. दरम्यान, अहमदपूर, उदगीर तालुक्यात दोन कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू झाले आहेत.
तीनशे कर्मचारी सेवेत
एका कोविड केअर सेंटरवर किमान १० ते १५ कर्मचारी कंत्राटी पद्धतीने होते. सध्या जिल्ह्यात बारा नंबर पाटी येथे एकच कोविड केअर सेंटर सुरू आहे. बंद केलेले दोन सेंटर पुन्हा सुरू होत आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ३०० कर्मचारी सेवेत आहेत.
जिल्ह्यात जवळपास १७ कोविड केअर सेंटर सुरू होते. त्यापैकी एकच सेंटर सुरू असल्याने अनेकांची सेवा खंडित करण्यात आली. अडचणीच्या काळात आम्ही केलेले काम लक्षात घेऊन सेवासातत्य द्यावे, अशी आमची मागणी असल्याचे अस्लम सय्यद म्हणाले.
तीन-तीन महिन्यांच्या कालावधीनंतर पुन्हा ऑर्डर देण्यात आली. जवळपास वर्षभरापासून आम्ही सेवा दिली आहे. केलेल्या कामाचा मोबदला मिळाला असला तरी सेवासातत्य मिळावे, अशी मागणी शासनाकडे आमची असल्याचे विजयकुमार बनसोडे यांनी सांगितले.
सर्वच कोविड केअर सेंटरवर रुग्णसेवेसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. प्रारंभीच्या काळामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. अशा वातावरणात रुग्णसेवा केली. साथीची तीव्रता कमी झाल्यानंतर अनेकांना कामावरून कमी केले असल्याने अडचण झाल्याचे बालाजी बंडे म्हणाले.