आंतरजिल्हा बदली; लातूर जिल्हा परिषदेतून १६ शिक्षक कार्यमुक्त !
By संदीप शिंदे | Updated: September 7, 2022 18:18 IST2022-09-07T18:18:30+5:302022-09-07T18:18:48+5:30
रिक्तपदाचा अहवाल शुन्य कळविल्याने भुमिपुत्रांना संधी नाही

आंतरजिल्हा बदली; लातूर जिल्हा परिषदेतून १६ शिक्षक कार्यमुक्त !
लातूर : शिक्षण विभागाच्या वतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात येत असून, जिल्ह्यातून १८ शिक्षक स्वजिल्ह्यात परतले आहेत. यातील १६ शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात आले. दरम्यान, शिक्षण विभागाने बदली प्रक्रियेसाठी रिक्त पदाचा अहवाल शुन्य कळविल्याने लातूरला येऊ इच्छिणाऱ्या भुमिपुत्रांचा हिरमोड झाला असून, १५ सप्टेंबरनंतर शिक्षण विभागाकडून पदोन्नती प्रक्रिया राबविली जाईल, त्यानंतर रिक्त जागांचा तपशील समाेर येणार आहे.
जिल्ह्यात जि.प.च्या १२७८ शाळा असून, ५ हजार ६८२ शिक्षकांची संख्या आहे. गेल्या काही वर्षांपासून आंतरजिल्हा बदली प्रक्रिया रखडली होती. शासनाने यंदा बदली प्रक्रियेसाठी पोर्टल तयार करुन जिल्हानिहाय रिक्त पदांचा अहवाल मागविला होता. त्यानुसार जिल्ह्यात येण्यासाठी १४५५ शिक्षक इच्छुक हाेते. मात्र, शिक्षण विभागाने रिक्त पदांचा अहवाल शुन्य कळविल्याने या शिक्षकांसाठी लातूर जि.प.ची दारे बंद झाली आहेत. दरम्यान, यावर्षीच्या बदली प्रक्रियेत १८ शिक्षक स्वजिल्ह्यात जात असून, सध्या १६ जणांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांच्याजागी बदलीने आलेल्या १४ शिक्षकांना सेवाज्येष्ठतेनुसार संधी दिली जाणार असल्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे यांनी सांगितले.
१५ सप्टेंबरनंतर पदोन्नती प्रक्रिया?
जिल्ह्यात शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधरांच्या पदोन्नत्या रखडलेल्या आहेत. या जागांवर पदोन्नती होईल, तेव्हाच रिक्त जागांचा तपशील समोर येणार असून, १५ सप्टेंबरनंतर पदोन्नतीला मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, पदोन्नतीसह अन्य मागण्यांसाठी शिक्षक समन्वय समितीच्या वतीने जि.प. समोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यापैकी पदोन्नतीचीच मागणी पुर्ण होत असून, इतर मागण्यांबाबतही लवकर निर्णय घेण्याची मागणी शिक्षक काँग्रसच्या वतीने जिल्हाध्यक्ष केशव गंभीरे यांनी केली आहे.