जंतांमुळे ॲनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे, कुपोषण, थकवा व अस्वस्थता, आतड्यास सूज येणे असा बालकांवर परिणाम होतो. १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक असते. असे आजार उद्भवू नयेत म्हणून आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेमार्फत १ मार्चपासून राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविण्यात येत आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे म्हणाले, जंतनाशक ही मोहीम वर्षातून दोनदा राबविण्यात येते. जिल्ह्यातील शाळा व अंगणवाड्यांत १ मार्च रोजी ही मोहीम राबविण्यात येणार आहे. सर्व शासकीय, अनुदानित, आश्रमशाळा, महापालिका शाळा, खासगी शाळेतील इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुला-मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत गोळी देण्यात येणार आहे.
चांगल्या आरोग्यासाठी गोळी गरजेची...
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आहे. १ ते १९ वयोगटातील मुला-मुलींचे आरोग्य चांगले राहावे, पोषण चांगले व्हावे, शिक्षण आणि जीवनाचा दर्जा उंचाविण्यासाठी ही मोहीम महत्त्वाची आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुला- मुलींना जंतनाशक गोळी द्यावी.
- अभिनव गोयल, सीईओ, जिल्हा परिषद
पावणेपाच लाख मुला-मुलींना दिली जाणार गोळी...
जिल्ह्यात सरकारी व खासगी अशा एकूण २०११ शाळा आहेत. तेथील ३ लाख २७ हजार ५१९ तसेच अंगणवाडीतील १ लाख ४९ हजार ३८२ मुला-मुलींना जंतनाशक गोळी सोमवारी दिली जाणार आहे. शाळाबाह्य २ हजार ९३६ मुला-मुलींना आशा स्वयंसेविकांमार्फत ही गोळी खाऊ घातली जाणार आहे. एकूण ४ लाख ७९ हजार ९२० मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा, अंगणवाडीत न आलेल्या बालकांना आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन ही गोळी देणार आहेत.
- डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी